मुंबईमध्ये तीन महापालिका करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 03:28 IST2017-07-26T03:26:56+5:302017-07-26T03:28:13+5:30
दिल्लीच्या धर्तीवर मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करण्याची मागणी काँग्रेसचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.

मुंबईमध्ये तीन महापालिका करा
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिल्लीच्या धर्तीवर मुंबई महापालिकेचे त्रिभाजन करण्याची मागणी काँग्रेसचे सदस्य आणि माजी मंत्री नसीम खान यांनी आज विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
कोट्यवधीची लोकसंख्या असलेल्या मुंबईकरांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात मुंबई महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. मुंबईकर आजही पायाभूत सुविधेपासून वंचित असल्याने दिल्लीच्या धर्तीवर मुंबई महानगरपालिकेचे त्रिभाजन करून मुंबईसह पूर्व व पश्चिम उपनगरात नवीन महापालिका स्थापन करा, अशी काँगे्रसचे आमदार नसीम खान यांनी केली.
मुंबईत सुमारे दोन कोटीहून अधिक लोक राहतात. त्यांना नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे. पण या पालिकेच्या काहीएक मर्यादा आहेत. पावसाळ्यात येथे नेहमीची खड्डे पडतात. आजही हीच परिस्थिती आहे. खड्डयात पडून अनेक जखमी तसेच मृत्यूमुखी पडतात. एवढेच नव्हे तर या मुंबानगरीची साफसफाईही व्यवस्थित होत नाही. एकऐवजी तीन महापालिका झाल्या तर प्रशासनात सुटसुटीतपणा येईल आणि नागरी सुविधा प्रभावीपणे पुरविता येतील, असे ते म्हणाले.
मुंबईबरोबरच पूर्व व पश्चिम उपनगरात नवीन महापालिका स्थापन केल्यास या मुंबईला तीन महापौर, तीन आयुक्त मिळतील. त्यामुळे नागरी कामे चांगल्या पद्धतीने मार्गी लागतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी लक्ष घालून लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही नसीम खान यांनी केली.