मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 07:16 IST2025-12-21T07:15:39+5:302025-12-21T07:16:06+5:30
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते. दुपारी त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस संसदीय कामकाज समितीची बैठक झाली. या बैठकीला मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह अन्य ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका चेन्नीथला यांनी स्पष्ट केली.

मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसेचा सहभाग असलेल्या महाविकास आघाडीसोबत युती नकोच; त्यापेक्षा 'एकला चलो रे' हीच भूमिका मुंबई पालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसने कायम ठेवली आहे. त्याचबरोबर शेवटचा प्रयत्न म्हणून वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्यासंदर्भात काँग्रेस शिष्टमंडळ वंचितच्या नेत्याची भेट घेणार असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला शनिवारी मुंबई दौऱ्यावर होते. दुपारी त्यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस संसदीय कामकाज समितीची बैठक झाली. या बैठकीला मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह अन्य ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. याच बैठकीत निवडणूक स्वबळावर लढण्याची भूमिका चेन्नीथला यांनी स्पष्ट केली.
मनसे आणि उद्धवसेना यांच्यातील युतीची अधिकृत घोषणा लवकरच अपेक्षित आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादीही या युतीत सामील होण्याची चर्चा आहे. मात्र, महाविकास आघाडी सोबत मनसेला घेण्यास काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे. तरीही, भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढावे, अशी साद मविआच्या नेत्यांनी काँग्रेसला घातली होती. मात्र, काँग्रेसने निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध महायुती आणि महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.
निवडणुकीच्या या लढाईत सच्चे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष लोकांनी आमच्यासोबत यावे. आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू. आमचा जाहीरनामा तुमच्यासमोर लवकरच सादर करू, त्यामुळे मतदारांनी आम्हाला साथ द्यावी, असे आवाहन चेन्नीथला यांनी केले. तर, मुंबईकरांना धर्म, प्रांत, भाषेवरून होणाऱ्या वादात पडायचे नाही, मुंबईकरांना विवाद नको, तर विकास हवा आहे. निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आलेल्या शिबिरातच झालेला आहे, असे गायकवाड म्हणाल्या.
आंबेडकरी समाजाची मते वळवण्याचा प्रयत्न
रिपब्लिकन पक्षातील मोठा गट असलेला रामदास आठवले यांचा गट भाजपसोबत आहे. तर, जोगेंद्र कवाडे आणि आनंदराज आंबेडकर यांनी शिंदेसेनेशी सहकार्य केले आहे. त्यामुळे आंबेडकरी समाजाची मते आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसला मेहनत करावी लागत आहे. साहजिकच वंचित सोबत या पक्षाची युती होण्याची चर्चा रंगली आहे. दोन्ही पक्षांकडून अजून त्याविषयी काहीही स्पष्टता नाही. मात्र, शेवटचा प्रयत्न म्हणून काँग्रेसचे एक शिष्टमंडळ वंचितची भेट घेणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते.