सुपारी देऊन ‘त्या’ युगुलाचा खून
By Admin | Updated: October 29, 2014 00:39 IST2014-10-29T00:39:22+5:302014-10-29T00:39:22+5:30
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसह तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. ही घटना माहूर येथील रामगड किल्ल्यातील हत्ती दरवाज्याजवळ उघडकीस आली होती.

सुपारी देऊन ‘त्या’ युगुलाचा खून
माहूरची घटना : दीड महिन्यानंतर छडा, पाच मारेकरी गजाआड
माहूर (यवतमाळ) : अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीसह तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. ही घटना माहूर येथील रामगड किल्ल्यातील हत्ती दरवाज्याजवळ उघडकीस आली होती. मारेकऱ्यांनी कुठलाही पुरावा न सोडल्याने या प्रकरणाचा गुंता वाढत गेला. मात्र गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस मारेकऱ्यांपर्यंत पोहोचलेच. दीड महिन्यानंतर घटनेचा छडा लागून पाच मारेकऱ्यांना अटक करण्यात यशस्वी झाले. हे दुहेरी हत्याकांड सुपारी घेऊन घडविल्याचे तपासात पुढे आले आहे.
शाहरूख फिरोज खान पठाण रा. उमरखेड असे मृत तरुणाचे तर निलोफर बेग खालीद बेग रा. पुसद असे तरूणीचे नाव आहे. शाहरूख हा यवतमाळ येथे तर निलोफर ही पुसद येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. १० सप्टेंबरला पहाटे या दोघांचा येथील हत्ती दरवाजा परिसरात स्थानिक नागरिकांना छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आले होते. मात्र मारेकऱ्यांनी घटनास्थळी कुठलेही पुरावे सोडले नव्हते. त्यामुळे पोलिसांपुढे घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक परमजीतसिंह दहिया यांनी या दुहेरी हत्याकांडाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीधर पवार यांच्याकडे सोपविला. सुरूवातीला हा तपास कॉल डिटेल्सवर केंद्रित करण्यात आला. मात्र त्यातून काहीच हाती लागले नाही. अखेर पोलिसांनी गोपनीय माहितीकडे लक्ष केंद्रित केले. त्यामध्ये राजू ऊर्फ राजा रघुनाथ गाडेकर (२०) रा. कोलामपुरा माहूर याचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्याची घरझडती घेतली. त्यामध्ये निलोफरचा मोबाईल आढळून आला.
मोबाईल हाती लागल्याने राजाचे बिंग फुटले. त्याने पोलिसांपुढे घटनेची कबुली दिली. त्यामध्ये गावातीलच रघु डॉन, जावेद पेंटर आणि त्यांच्या तीन साथिदारांच्या मदतीने सुपारी घेऊन हा खून केल्याची माहिती दिली. तसेच साथीदारांची नावेही उघड केली. त्यावरून पोलिसांनी राजू ऊर्फ राजा गाडेकर, शेख जावेद शेख हुसेन ऊर्फ पेंटर (३८), रंगराव शामराव बाबटकर (२५), शेषराव ऊर्फ पिंटू शामराव बाबटकर (१९), कृष्णा ऊर्फ बाबू मारोतराव शिंदे सर्व रा. माहूर यांना पोलिसांनी अटक केली. घरझडतीत रघु डॉन याच्या घरातून शाहरूखचा मोबाईल, पाकीटमधील विदेशी चलनी नोटा आढळून आल्या, त्या पोलिसांनी जप्त केल्या. तसेच घटनेत वापरलेला धारदार चाकू आणि कुऱ्हाडही मारेकऱ्यांनी पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे पोलिसातून सांगण्यात आले.(प्रतिनिधी)
-