लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदाच्या वर्षातील एक दुर्मीळ खगोलीय घटना अनुभवता येणार आहे. रविवारी खग्रास चंद्रग्रहण दिसणार असून, खगोलप्रेमींना ‘ब्लड मून’ अर्थात लाल रंगाचा चंद्र पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. हे ग्रहण ५ तास २७ मिनिटे असणार असून, रात्री ९:२७ पासून ते मध्यरात्री १२:२२ वाजेपर्यंत हे दृश्य पाहता येईल.
अंधश्रद्धा न बाळगता, या नैसर्गिक घटनेचे निरीक्षण आणि अभ्यास करणे महत्त्वाचे आहे, असा सल्ला स्काय वॉच ग्रुपचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिला. यावर्षी भारतातून फारसे ग्रहण दिसले नव्हते, त्यामुळे हे खग्रास चंद्रग्रहण पाहण्याची उत्सुकता अधिक आहे. याच दरम्यान चंद्र पूर्णपणे लाल रंगाचा दिसेल, म्हणूनच त्याला ‘ब्लड मून’ किंवा ‘रेड मून’ असे म्हटले जाते. ही खग्रास स्थिती तब्बल २ तास ७ मिनिटे टिकेल. आकाशात ढग नसतील, तर हे सुंदर खगोलीय दृश्य अगदी स्पष्टपणे पाहता येणार आहे.