एडस झाल्याने प्रेयसीचा खून
By Admin | Updated: March 6, 2017 03:44 IST2017-03-06T03:44:53+5:302017-03-06T03:44:53+5:30
गोलमैदानात महिलेचा गळा चिरून हत्या करणाऱ्या प्रियकरला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे.

एडस झाल्याने प्रेयसीचा खून
उल्हासनगर : गोलमैदानात महिलेचा गळा चिरून हत्या करणाऱ्या प्रियकरला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. पे्रयसीमुळे एड्सची लागण झाल्याच्या संतापातून खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. हा प्रियकर मूळचा पाकिस्तानचा आहे आणि व्हिसा संपूनही तो भारतात रहात होता. त्याची प्रेयसीही विवाहित आहे, पण पतीशी पटत नसल्याने वेगळी रहात होती. प्रियकराला पोलिसांनी अटक केल्याने आता माझे कुटुंब कसे जगेल, असा प्रश्न करत त्याने आपली अगतिकता व्यक्त केली. त्याला ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
कॅम्प दोनमधील गोलमैदानात २७ मार्चला रात्री वंदना जगताप (वय २६) ही महिला गळा चिरलेल्या अवस्थेत सापडली होती. या प्रकाराने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मैदानात विरंगुळयासाठी आलेल्या महिला, मुले व पुरूषांत घबराट पसरली होती. गोलमैदान मिडटाऊन चौकीतील पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत तिला रूग्णवाहिकेतून मध्यवर्ती रूग्णालयात हलविले. पण डॉक्टरांनी तपासल्यावर तिला मृत घोषित केले. उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शकील शेख यांनी चौकशीची सूत्रे हलविल्यावर प्रियकराने हत्या केल्याचे उघड झाले. प्रियकर पाकिस्तानातून कुटुंबासह भारतात आला आहे. सुरेशप्रेम शिजू (वय २८) असे त्याचे नाव आहे.
एड्सची लागण झाल्याने आपण खंगूनखंगून मरणार. कुटुंबाचे कसे होईल? ही चिंता त्याला पोखरू लागली. जीवाच्या भीतीने पाकिस्तानातून पोट भरण्यासाठी भारतात आलो. १ मार्चला पासपोर्टची तारीख संपली. फक्त व्हिसा आहे. आता जगायचे कसे? जगता तरी येईल का, अशा अनेक प्रश्नांचे काहूर त्याच्या मनात उठले. त्यात वंदनाचा सतत पैशांचा तगादा सुरू होता. जिच्यामुळे एड्स झाला. तिच्यामुळे मी हकनाक मरणार. मग तिलाही का मारू नये, तिला संपवले पाहिजे. हे मनात धरून २७ मार्चला रात्री नऊ वाजता तिला त्याने गोलमैदानात बोलाविले. कोणताही मागचा-पुढचा विचार न करता, धारदार चाकूने तिचा गळा च्चिरून त्याने तेथून पळ काढला. पण तिच्याबद्दल माहिती गोळा केल्यावर पोलिसांना त्याची माहिती समजली आणि तो बेपत्ता असल्याचे लक्षात आले. तेव्हा माग काढत पोलिसांनी उल्हासनगर स्टेशनवरून त्याला शुक्रवारी अटक केली. तेव्हा त्याने हत्येचे कारण सांगितले. त्याला न्यायालयात हजर केल्यावर ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील शेख यांनी दिली. (प्रतिनिधी)
>प्रकृती बिघडल्याने उघड झाली लागण
म्हारळ गावातील वंदना नवऱ्यापासून वेगळी रहात होती. तिला दहा वर्षाची मुलगी आणि पाच वर्षाचा मुलगा आहे. उल्हासनगरला ती कामानिमित्त येत असे. तेथे तिची ओळख रिक्षाचालक सुरेशप्रेमशी झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यावर ते तीन वर्षे पती-पत्नी म्हणून राहू लागले. वंदनाने पैशाचा तगादा लावल्याने दोघांत भांडणे होऊ लागली.
सुरेशप्रेमची प्रकृती बिघडून लागल्याने त्याने डॉक्टरांकडे तपासणी केली. त्यात त्याला एचआव्हीची झाल्याचे स्पष्ट झाले. त्याने वंदनाकडे चौकशी केल्यावर तिला आधीच एड्स असल्याचे उघड झाले. तिच्यामुळे आपल्याला बाधा झाल्याने तो संतापला होता.