दुष्काळग्रस्तांच्या दु:खावर मायेची फुंकर
By Admin | Updated: September 27, 2015 05:25 IST2015-09-27T05:25:14+5:302015-09-27T05:25:14+5:30
यंदा कोल्हापुरातील विन गु्रप, सनी स्पोर्टस्, जैनबांधव आणि डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत.

दुष्काळग्रस्तांच्या दु:खावर मायेची फुंकर
यंदा कोल्हापुरातील विन गु्रप, सनी स्पोर्टस्, जैनबांधव आणि डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. कोल्हापुरातील राजारामपुरी नववी गल्ली येथील विन गु्रपच्या प्रशांत आडके, गिरीश गोते, सचिन आवळे, माजी महापौर दीपक जाधव, मुरलीधर जाधव, तुषार चोपडे, कारेकर सराफ, राजू चव्हाण, निशिकांत काजवे, दीपक जगनाडे, बंडू रोकडे, विजय सूर्यवंशी, विनायक सूर्यवंशी यांनी प्रत्येकी जमेल तितकी वर्गणी काढली. दहीहंडीसाठी जमलेली १ लाख २१ हजार रुपये व जमलेली ५० हजार वर्गणी असे एकूण १ लाख ७१ हजार रुपयांची रक्कम या शेतकरीबांधवांना देण्यासाठी तयार ठेवली आहे. त्यामध्ये गणेशोत्सवात जमणारी रक्कम घालून असे ३ लाख रुपये देण्याचा मानस या मंडळाचा आहे.
कोल्हापुरातीलच जुना बुधवार पेठ येथील सनी स्पोर्ट्स या मंडळाने मागील वर्षी केलेल्या उत्कृष्ट देखावा स्पर्धेत मिळालेली पहिल्या क्रमांकाची १० हजार रुपये अधिक यंदाच्या गणेशोत्सवात फटाके, वाद्याला फाटा देत जमविलेली रक्कम अशी जमेल तितकी मदत देण्याचा मानस केला आहे. ही रक्कम ते जिल्हाधिकाऱ्यांकडे गणेशोत्सवानंतर देणार आहेत. याचबरोबर डॉ. डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थ्यांनीही अशाच पद्धतीने केवळ विद्यार्थ्यांच्याकडून १ लाख रुपये जमा केले आहेत. हे पैसेही ते जिल्हाधिकाऱ्यांकडे लवकरच जमा करणार आहेत. याशिवाय दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पर्युषण महापर्व काळात सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन डॉ. स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामी यांनी केले आहे. जैन समाजाकडून जमणारा लाखोंचा निधी ते जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करणार आहेत.
नाशिकमध्ये उत्सवाच्या खर्चात कपात
नाशिक शहरातील सातपूर गावातील मंडई परिसरातील कार्यकर्त्यांचे हे मंडळ आहे. या मंडळाची स्थापना २० वर्षांपूर्वी झाली. सध्या मंडळाचे अध्यक्ष तुकाराम बोराडे आहेत. मंडळाच्या वतीने धार्मिक देखाव्यांवर भर दिला जातो. त्यानंतर विसर्जन मिरवणूक उत्साहात काढली जाते. मिरवणुकीसाठी आदिवासी भागातील पथकेही असतात. यंदा मंडळाने त्यावर होणारा खर्च कमी केला आहे. मिरवणुकीचा खर्च वाचून त्यातील १५ हजार रुपये दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणार आहेत.
--------
यंदाचा आषाढ कोरडा गेला. भाद्रपदात काहीशी रिपरिप झाली. परंतु, बहुतांश महाराष्ट्र तहानलेलाच आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही गावे या दुष्काळझळांनी होरपळत असताना, आराध्य गणेशाचे स्वागत करायचे तरी कसे, असा प्रश्न सर्व सश्रद्धांना छळत होता. त्यावर उपाय काढण्यासाठी काही मंडळे पुढे सरसावली. दुष्काळाने कासावीस झालेल्या शुष्क चेहऱ्यावर मायेच्या ओलाव्याचा शिडकावा करून गणेशोत्सव साजरा करण्याचे त्यांनी योजिले. त्यासाठी कुणी दुष्काळग्रस्तांची व्यथा मांडणारे देखावे तयार केले, तर कुणी साधेपणाने गणेशोत्सव साजरा करून वाचलेले पैसे दुष्काळग्रस्तांना दिले. राज्यभरातील या अशा सेवाभावी, सजग उपक्रमांचा हा धांडोळा...
----------
दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत असून, या दुष्काळामुळे गोरगरिबांची होरपळ होत आहे. या भीषण परिस्थितीची जाणीव ठेवून, खामगाव येथील एकता नवयुवक मंडळाने त्याचे रौप्यमहोत्सवी वर्ष असूनही गणेशोत्सव साजरा न करता, जमा झालेल्या वर्गणीतून गोरगरीब जनतेसाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. गणपतीच्या वर्गणीतून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वानुमते घेतला आहे. गणेशोत्सवासाठी होणारा खर्च गोरगरीब, शेतकरी आणि शेतमजुरांच्या मदतीसह, औषधोपचार आणि अन्नदानासारख्या उपक्रमांवर खर्च करण्याचा निर्धार मंडळाने केला आहे. याशिवाय वृक्षलागवड, रक्तदान शिबिरे, मोफत औषध शिबिरे यांसारखेही उपक्रम मंडळाच्या वतीने राबविण्यात येणार आहेत.
------
रोशणाईच्या खर्चकपातीतून दुष्काळग्रस्तांना करणार मदत
जिल्ह्यातील अहेरी येथील आझाद गणेश मंडळ राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उतरले आहे. गणेश उत्सवात मंडळाची रोशणाई, देखावा व गाजावाजासाठी लाखो रुपये खर्च होतात. मात्र या वर्षी या मंडळाने रोशणाई व देखाव्यासाठी लागणारा पूर्ण खर्च कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा गणेशोत्सवात मंडळातर्फे विद्युत रोशणाई व विविध प्रकारचे देखावे लावण्यात आले नाहीत. त्यामुळे मंडळाच्या खर्चातील हजारो रुपयांची बचत होणार आहे. सदर रक्कम राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून पाठविली जाणार आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतले. खर्चकपातीतून जमा झालेली रक्कम व इतरांनी दान केलेली रक्कम गणेश मंडळ नाना, मकरंद यांच्या ‘नाम’ या संस्थेला सुपुर्द करणार आहे.
संस्थान गणपती ट्रस्टतर्फे गोशाळांना चार ट्रक चारा
औरंगाबादचे ग्रामदैवत राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर चार ट्रक चारा गोशाळांना देण्यात येणार आहे. संस्थान गणपती मंदिर ट्रस्टने दुष्काळग्रस्तांना मदतीसाठी जिल्ह्यातील गणेश मंडळांत आघाडी घेतली आहे. यंदा दुष्काळी भागातील गोशाळांना चारावाटप करण्याचा निर्णय ट्रस्टचे अध्यक्ष शोभागचंद चोरडिया यांनी घेतला. त्यानुसार ग्रामीण भागातील गोशाळांना चार ट्रक चारापुरवठा करण्यात येत आहे. विश्वस्त प्रफुल्ल मालाणी यांनी सांगितले की, जनावरांना चारा कमी पडू देणार नाही. आवश्यकता भासल्यास आणखी चारा पुरविण्यात येईल. गोशाळांकडून जशी मागणी येईल तसा पुरवठा केला जाईल. याशिवाय ट्रस्टच्या वतीने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सजीव देखावा सादर करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही दुष्काळ पडला होता तेव्हा महाराजांनी काय केले हे देखाव्यात दाखविले जात आहे.
---------
व्यथा मांडल्या देखाव्यातून
वैभववाडी तालुक्यातील तिथवली येथील रहिवासी आणि गिरणी कामगार वारस उत्कर्ष सेवा संघाचे जिल्हाप्रमुख दिलीप कुडाळकर यांनी या वर्षी ‘बळीराजा’ संकल्पनेवर आधारित चलचित्र देखावा उभारून दुष्काळग्रस्तांच्या व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी पेण येथील मूर्तिकार नीलेश समेळ यांच्याकडून ‘बळीराजा’च्या स्वरूपातील मूर्ती बनवून घेतली. यातून जमा झालेली रक्कम ते दुष्काळग्रस्तांसाठी निधी म्हणून देणार आहेत. कुडाळकर यांनी गिरणी कामगारांचे राज्यभर संघटन करीत असताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचा प्रश्न जवळून पाहिला आहे. कोकणातील दानशूर गणेशभक्तांनी अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी सढळ हस्ते देणगी देऊन त्यांचे सांत्वन करावे, असे आवाहन कुडाळकर यांनी केले आहे.