विश्वस्त निवडीवर भाजपाचाच आक्षेप
By Admin | Updated: July 31, 2016 04:20 IST2016-07-31T04:20:45+5:302016-07-31T04:20:45+5:30
साई संस्थानच्या विश्वस्त निवडीत उपाध्यक्षपद न मिळाल्याने शिवसेनेने विश्वस्त मंडळातून बाहेर पडण्याचा इशारा दिला

विश्वस्त निवडीवर भाजपाचाच आक्षेप
शिर्डी : साई संस्थानच्या विश्वस्त निवडीत उपाध्यक्षपद न मिळाल्याने शिवसेनेने विश्वस्त मंडळातून बाहेर पडण्याचा इशारा दिला असतानाच, आता जिल्हा व शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनीही विरोध दर्शविला आहे. सरकारने निष्ठावंतांना डावलून बाहेरून आलेल्यांची व हुजरेगिरी करणारांची नियुक्ती केल्याचा तसेच नव्या विश्वस्तांना काँग्रेसचेच चष्मे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राज्य व नंतर केंद्रीय पक्ष पातळीवर याची दाद मागू.अपयश आले तर पक्षासमोर भावना व्यक्त करण्यासाठी गावबंद, रास्ता रोको सारखे अन्य मार्ग हाताळू, असा इशारा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, जिल्हा सरचिटणीस नितीन कापसे, तालुकाध्यक्ष नंदू जेजुरकर, शहराध्यक्ष शिवाजी गोंदकर व
सचिन शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला़
दरम्यान, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा व्यवस्थापन मंडळात समावेश नसल्याने काँग्रेसनेही तालुक्यात शुक्रवारपासून आंदोलने सुरू केली आहेत़ शहर व परिसराच्या विकासासाठी प्रसंगी काँग्रेस व शिवसेनेशी चर्चा करून सर्वपक्षीय लढा उभारू, अशा गर्भित इशाऱ्याचे संकेतही राजेंद्र गोंदकर यांनी यावेळी दिले़
देशात जनसंघाने पहिली ग्रामपंचायत शिर्डीत जिंकली होती़ याची आठवण करून देत स्थानिक निष्ठावंताना डावलून अथवा विश्वासात न घेता वाकचौरे, कोल्हे, तांबे सारख्यांची निवड केल्याबद्दल पक्षाच्या भूमिकेवर आक्षेप घेण्यात आला़
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत, आता जनतेच्या समोर कसे जाणार, राजकीय व्यवस्था म्हणून विश्वस्त मंडळ नेमले जातेय का? असा सवाल उपस्थित करत भाजपा पदाधिकाऱ्यांनी विश्वस्तांच्या निवडी कोणत्या निकषावर केल्या, यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले़ (प्रतिनिधी)
>राज्य सरकारने शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळात आपला समावेश केला नाही, म्हणून आपण नाराज नाही. कुणाची नियुक्ती करायची हा सरकारचा अधिकार आहे. त्यांनी चांगले काम करावे, साईबाबांच्या नावाला गालबोट लागणार नाही, असा कारभार करावा ही अपेक्षा आहे. - राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेता