मागासवर्गाच्या मतांसाठी भाजपाचा ‘भीमसंकल्प’

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 06:42 AM2019-01-21T06:42:52+5:302019-01-21T06:43:04+5:30

येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी अनुसूचित जाती-जमाती, तसेच मागासवर्गीय समाजाची ‘व्होटबँक’ डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ‘भीमसंकल्प’ तयार केला आहे.

BJP's 'Bhimsankalpa' for backward caste votes | मागासवर्गाच्या मतांसाठी भाजपाचा ‘भीमसंकल्प’

मागासवर्गाच्या मतांसाठी भाजपाचा ‘भीमसंकल्प’

googlenewsNext

- योगेश पांडे 
नागपूर : येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी अनुसूचित जाती-जमाती, तसेच मागासवर्गीय समाजाची ‘व्होटबँक’ डोळ्यासमोर ठेवून भाजपाने ‘भीमसंकल्प’ तयार केला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून वस्त्या-वस्त्यांवर सामूहिक भोजनाच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क मोहीम हाती घेण्यात घेणार आहे, तसेच न्यायपालिकेत आरक्षण लागू करावे, असा प्रस्तावही अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात पारित करण्यात आला.
मागील साडेचार वर्षांत रोहित वेमुलाचे प्रकरण, उत्तर प्रदेशसह विविध राज्यात अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांवर झालेले हल्ले, तसेच आरक्षणाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या अनुचित वक्तव्यांमुळे वाद निर्माण झाले.

केंद्रातील मोदी सरकार दलितविरोधी असल्याची टीका झाली. याचा फटका भाजपाला राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील निवडणुकीत बसला. म्हणूनच भाजपाशासित प्रदेशात अनुसूचित जातींच्या लोकांवर होत असलेल्या अत्याचारावर नियंत्रण आणण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे.
एकीकडे आर्थिक निकषांवर १० टक्के आरक्षण देत सवर्णांना खूश केल्यानंतर आता अनुसूचित जाती-जमातींच्या ‘व्होटबँक’वर भाजपाने लक्ष केंद्रित केले आहे. यासाठीच नागपुरात अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री विजय सांपला, कृषी राज्यमंत्री कृष्णा राज, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद सोनकर, दुष्यंत गौतम, नारायण केसरी आदी उपस्थित होते.

२० ते ३० जानेवारी या कालावधीत देशभरात भाजपाच्या अनुसूचित जातीच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणींच्या बैठका घेण्यात येणार आहेत. यात पुढील कार्यक्रमांची माहिती देण्यात येईल. त्यानंतर १ ते १० फेब्रुवारी या कालावधीत मंडळ स्तरावर सामूहिक भोजनाच्या माध्यमातून समाजबांधवांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होईल. १२ फेब्रुवारीपासून ते २ मार्चपर्यंत व्यापक जनसंपर्क मोहीम चालविण्यात येणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, काँग्रेसने अनुसूचित जातींचा केवळ मतांसाठी वापर केला आहे. भाजपाने सौभाग्य योजनेद्वारे लोकांच्या घरोघरी वीज दिली. उज्ज्वला योजनेद्वारे गॅस जोडणी आणि शेगडी उपलब्ध करुन दिली. या योजनांचा सर्वाधिक लाभ अनुसूचित जातींमधील लोकांना झाला. २०२० पर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक पूर्ण होईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

इंदू मिलची जागा काँग्रेसला हडपायची होती-मुख्यमंत्री
मुंबईतील इंदू मिलची जागा काँग्रेसला हडपायची होती, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाजपाच्या विजय संकल्प
सभेत केला. आपल्या बापाचे स्मारक उभे केले, पण संविधानाच्या बापाचे स्मारक उभारण्यासाठी पुढाकार घेतला नाही, शब्दांत फडणवीस यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
>मतदारांच्या घरावर भाजपाचा झेंडा !
पुणे-आता मतदारांच्या घरावर भाजपाचा झेंडा लावण्याचा कार्यक्रम भाजपाने आखला आहे. ‘हमारा घर भाजपा का घर’ हा पक्षाचा मुख्य अजेंडा असून, जे मतदार भाजपाला मतदान करणार आहेत, ते आपल्या घरावर भाजपाचा झेंडा लावून पाठिंबा देतील. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा कार्यक्रम हाती घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय मानव संसाधनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

Web Title: BJP's 'Bhimsankalpa' for backward caste votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा