Eknath Shinde: पोटनिवडणूक हरल्यावर भाजप राज्य जिंकताे; शिंदेंची जोरदार टोलेबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 05:56 IST2023-03-04T05:55:50+5:302023-03-04T05:56:36+5:30
सत्ता गेल्याने अंधारी आली : मुख्यमंत्र्यांनी काढले अजित पवारांना चिमटे

Eknath Shinde: पोटनिवडणूक हरल्यावर भाजप राज्य जिंकताे; शिंदेंची जोरदार टोलेबाजी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अचानक सत्ता गेल्याने तुम्हाला अंधारी आली आहे, त्यामुळे तुम्हाला आमच्या सरकारची चांगली कामे दिसत नाहीत, असे चिमटे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना काढतानाच, पोटनिवडणूक हरला की भाजप राज्य जिंकतो हा इतिहास आहे, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
कसबा पेठ मतदारसंघात केलेल्या चुका आमच्या लक्षात आल्या असून त्या आता पुन्हा होणार नाहीत. कसबा पेठ ही पोटनिवडणूक होती. येथील निकालाने आम्ही सावध झालो आहोत. आता आम्ही कामाने लोकांची मने जिंकू. त्यामुळे कसब्यात पुढे काय निर्णय येईल तो बघा, असेही शिंदे यांनी सांगितले. राज्यपालांच्या अभिभाषणावर दोन दिवसांच्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
सार्वत्रिक निवडणुका आम्ही युती म्हणून लढणार आहोत. तुम्ही आघाडीत तीन पक्ष आहात आणि तुम्ही वेगळे लढला होतात. त्यामुळे एक पक्ष निवडणुकीला उभा राहणार आणि दुसरा काय भजन करणार काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
निवडणुकीत मास्टरकी
कसब्यातील निकालानंतर आता देश आणि राज्य जिंकण्याची भाषा झाली, पण तीन राज्ये भाजपने जिंकली हे विसरले आणि काही जणांची स्थिती बेगाने शादी
मैं अब्दुल्ला दिवाना अशी होती, असा
टोलाही लगावला. महाराष्ट्रात मी भाजपच्या सोबत आहे आणि निवडणुकीत माझी मास्टरकी आहे, असे शिंदे म्हणाले.
आत्मक्लेश करावा लागेल, असे काहीही बोललो नाही
nघटनाबाह्य सरकार अशी टीका करणारे तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात काय? लोकसेवा आयोग की निवडणूक आयोग यापेक्षा रिझल्टला महत्त्व आहे आणि मी रिझल्ट दिला.
nमी असे काही बोललो नाही की त्यामुळे यशवंतरावांच्या समाधी समोर बसून आत्मक्लेश करावा लागेल, असा टोलाही शिंदे यांनी अजित पवार यांना हाणला. राष्ट्रवादीत भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकांचे पोस्टर लागत आहेत. आधी एक नाव तरी ठरवा, मग बॅनर लावा, अशी कोपरखळीही मारली.
‘अजितदादा, सहशिवसेना पक्षप्रमुख बना...’
अजितदादा हल्ली प्रवक्ते झाल्यासारखेच बोलत आहेत. त्यांना शिवसेनेचे पदच दिले पाहिजे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दादांना सहशिवसेना पक्षप्रमुख बनवा, असा टोला लगावला. त्यावर लगेचच मुख्यमंत्री शिंदे यांनी तसे कसे करता येईल शिवसेना तर आता आपलीच आहे, असे म्हणताच एकच हशा उसळला.
सोन्यासारखी माणसं येतात, त्यांना चहा पाजू नको का?
वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या खर्चावरील टीकेलाही शिंदे यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले. अडीच वर्ष वर्षा बंगला बंद होता. तिथे फेसबुकवर ऑनलाइन असतानाही खर्च झाला.
दूरस्थ शिक्षण ऐकले होते, पण तेव्हा तर दूरस्थ प्रशासन सुरू होते, आता माझ्याकडे राज्यभरातून सोन्यासारखी माणसं येतात मग त्यांना चहापाणी नको द्यायला? चहापाणी देणे ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे शिंदे म्हणाले.