“चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम, पुढील निवडणुकीत...”; नारायण राणेंची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:16 IST2025-04-06T16:12:20+5:302025-04-06T16:16:46+5:30
BJP Union Minister Narayan Rane News: ३९ वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता , साहेब गेले शिवसेना संपली, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

“चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम, पुढील निवडणुकीत...”; नारायण राणेंची टीका
BJP Union Minister Narayan Rane News: दोन दिवस दिवसभर वादळी आणि प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर अखेरीस वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक आधी लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. या विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांची सही झाली. त्यामुळे हा आता कायदा बनला आहे. वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून राजकीय वर्तुळातही दावे-प्रतिदावे केले करण्यात येत असून, भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या विधेयकाला विरोध केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहेय
वक्फ बोर्ड विधेयकात काही चांगल्या सुधारणा आहेत. अफरातफरीला पायबंद बसून पारदर्शकता आली पाहिजे. पण, काही गोष्टी भाजप उकरून काढत आहे. फटाक्याची वात पेटवून पळून जायचे. ते फुटून झाले की मिरवायला यायचे, ही भाजपची वाईट सवय आहे. आम्हीच सगळे काही केले या वृत्तीचा आम्ही विरोध केला आहे. विधेयकाला विरोध करण्यापेक्षा भाजपच्या ढोंगाला आणि जमिनी बळकावून त्यांच्या व्यापारी मित्रांना काही देणार आहे त्या भ्रष्टाचाराला विरोध केला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. यावरून भाजपासह महायुतीतील नेते ठाकरे गटावर तिखट शब्दांत हल्लाबोल करत आहेत. यातच आता नारायण राणे यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरेंचे काम, पुढील निवडणुकीत...
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर नारायण राणे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, चांगल्या दिवशी नको त्या माणसाचे नाव घेत आहात. विकास , समृद्धी , लोकहीत हे त्यांचे काम नाही. शिव्या घालणे आणि चांगल्या कामात व्यत्यय आणणे हे उद्धव ठाकरे यांचे काम आहे. म्हणून पक्ष संपत चालला आहे. पुढील निवडणुकीत हा पक्ष राहत नाही. विधायक , सामाजिक , विकासात्मक अशी त्यांची विचारसरणी नाही. मी ३९ वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा पक्ष होता , साहेब गेले शिवसेना संपली, या शब्दांत नारायण राणे यांनी टीकास्त्र सोडले.
दरम्यान, रामनवमी आहे, सोबत भाजपाचा स्थापना दिवस आहे, त्या निमित्ताने मी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाची दिशा दाखवली. विकसित भारत बनवण्याचा त्यांचा संकल्प आहे, तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात चांगले काम सुरू आहे. देश आणि राज्यात लोक कल्याणाचा कारभार सुरू आहे. आता विरोधकांकडे दुसरे काम राहिलेले नाही, असे नारायण राणे म्हणाले.