स्वतंत्र विदर्भाला भाजपाचा पाठिंबा
By Admin | Updated: April 3, 2016 03:52 IST2016-04-03T03:52:47+5:302016-04-03T03:52:47+5:30
छोटी राज्ये असावीत ही भाजपाची भूमिका असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीबाबत पक्ष ठाम आहे. मात्र स्वतंत्र मराठवाड्याचा कोणताही विचार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष
स्वतंत्र विदर्भाला भाजपाचा पाठिंबा
नाशिक : छोटी राज्ये असावीत ही भाजपाची भूमिका असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीबाबत पक्ष ठाम आहे. मात्र स्वतंत्र मराठवाड्याचा कोणताही विचार नाही, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शनिवारी स्पष्ट केले. तसेच छोटी राज्ये निर्माण करण्यामागे कॉँग्रेसप्रमाणे राजकारण हा हेतू नसून प्रशासकीय सोय हाच मुद्दा असल्याचा दावाही त्यांनी केला.
नाशिकमध्ये शनिवारी भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक, तर रविवारी विस्तृत कार्य समितीची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दानवे यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड असे तीन राज्ये निर्माण केली, परंतु या राज्यातील सर्वांनी स्वागत केले आणि पेढे भरवून आनंद व्यक्त केला, मात्र कॉँग्रेस सत्तेवर असताना राजकीय दृष्टिकोनातून तेलंगण राज्याची निर्मिती झाली. त्यामुळे हिंसक घटना घडल्या असे सांगून प्रशासकीय भावनेतून राज्य निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. नाशिकच्या बैठकीत स्वतंत्र विदर्भासंदर्भात ठराव करण्याबाबत स्पष्टता न करता त्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ, असे सांगितले. मराठवाड्याबाबत मात्र भाजपाची कोणतीही भूमिका नसल्याचेही ते म्हणाले.
सेनेसमवेत निवडणूक युतीचा निर्णय स्थानिक स्तरावर
नाशिकमध्ये यापूर्वी झालेल्या बैठकीत शत प्रतिशत भाजपाचा नारा देण्यात आला होता. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या बैठकीत कोणतीही भूमिका घेणार हे दानवे यांनी स्पष्ट केले नाही. मात्र, शिवसेनेने सध्या पत्करलेल्या विरोधी भूमिकेबद्दल बोलताना आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती करावी किंवा नाही याबाबत स्थानिकस्तरावर अधिकार देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.