Uddhav Thackeray: कुजकट टोमणे, भारंभार इशारे अन् पोकळ धमक्या; उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपाची बोचरी टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 10:14 AM2022-05-15T10:14:48+5:302022-05-15T10:15:16+5:30

प्रत्यक्षात ज्या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध केला. त्यांच्याबरोबर आपणच सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलोय, हे मात्र पक्षप्रमुख सोयीस्करपणे विसरले असंही भाजपानं सांगितले.

BJP spokesperson Keshav Upadhyay criticized the speech of Shiv Sena chief Uddhav Thackeray | Uddhav Thackeray: कुजकट टोमणे, भारंभार इशारे अन् पोकळ धमक्या; उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपाची बोचरी टीका

Uddhav Thackeray: कुजकट टोमणे, भारंभार इशारे अन् पोकळ धमक्या; उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजपाची बोचरी टीका

Next

मुंबई – भाजपाचंहिंदुत्व नकली असल्याचा आरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत केला. मुंबईतल्या सभेत उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर विविध आरोप केले. त्याला आता भाजपाकडूनही प्रत्युत्तर मिळत आहे. तेच तेच पुन्हा पुन्हा सांगण्यासाठी एवढी मोठी सभा घेण्याची गरज नव्हती. त्यापेक्षा ई सभा घेतली असती तर सर्वांचे कष्ट तरी वाचले असते. बाकी चहुबाजूंनी त्रस्त झालेल्या पक्षप्रमुख कम मुख्यमंत्र्यांनी आपला त्रागा सभेतून व्यक्त केला असा टोला भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेनेला लगावला.

केशव उपाध्ये(BJP Keshav Upadhye) यांनी पोस्ट करत म्हटलं की,  कुजकट टोमणे, भारंभार इशारे आणि पोकळ धमक्या यांच्यापलीकडे पक्षप्रमुखांचे भाषण गेले नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नादी लागून स्वतःच्या हिंदुत्वाचं सत्व गमावल्यानंतर भाजपाच्या हिंदुत्वाला बोल लावण्याचा केविलवाणा प्रयत्न शिवसेना पक्षप्रमुखांनी केला. पण भाजपाचं हिंदुत्व किती प्रखर आणि प्रभावी आहे. याची माहिती सर्वसामान्य जनतेला आहे. बाकी महापालिका निवडणुका जवळ आल्याने मराठी माणूस मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असे घासून गुळगुळीत झालेले मुद्दे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा चर्चेत आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यावरून संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरून भाजपावर निराधार आरोप केले. पण प्रत्यक्षात ज्या काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला विरोध केला. त्यांच्याबरोबर आपणच सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलोय, हे मात्र पक्षप्रमुख सोयीस्करपणे विसरले असंही त्यांनी सांगितले.

त्याचसोबत औरंगाबादच्या नामांतराबाबत हात वर करत मुख्यमंत्र्यांनी आपली हतबलता व्यक्त केलीय. एकंदरीत मोठा गाजावाजा करून अखेर सुपरडुपर फ्लॉप झालेल्या सिनेमासारखं हे भाषण झालं. त्यात ना हिंदुत्वाचा हुंकार होता. ना महाराष्ट्राच्या विकासाची दिशा होती. ना स्वतःच्या शिवसैनिकांना काही संदेश होता. होती ती केवळ वैफल्यग्रस्तता, अगतिकता आणि त्रागा असंही भाजपाने म्हटलं आहे.

 “भाजपचे हिंदुत्व विकृत, विखारी अन् गळेकापू”; भव्य सभेत उद्धव ठाकरेंचा कडाडून हल्लाबोल

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

भाजपचा हिंदुत्वाचा बुरखा पुरता फाटल्याने त्यांचा भेसूर चेहरा समोर आला असून, विकृत, विखारी अन् गळेकापू राजकारण भाजप करीत असल्याचा हल्लाबोल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीमधील प्रचंड जाहीर सभेत केला. देवेंद्र फडणवीसांना मुंबई स्वतंत्र करायची आहे, तीच त्यांच्या मालकांची इच्छा आहे; पण तुमच्या मालकासकट कोणीही आले तरी हौतात्म्य पत्करून मिळविलेल्या मुंबईचे लचके तोडणाऱ्यांचेच तुकडे होतील, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

या सभेला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या शिवसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. उद्धव ठाकरे यांनी भाषणात भाजप, केंद्र सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टीकेचे लक्ष्य केले. खोट्या हिंदुत्वाचा बुरखा घातलेला भाजप देशाला भरकटवण्याचे काम करीत आहे. काश्मिरी पंडितांच्या होत असलेल्या हत्या रोखण्यात येत असलेले अपयश, वाढती महागाई यावरून भाजपावर हल्ले चढविले.

Web Title: BJP spokesperson Keshav Upadhyay criticized the speech of Shiv Sena chief Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.