मुंबई: भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख 'लावारीस' म्हणून केला आहे. एका ट्विटला उत्तर देताना अवधूत वाघ यांनी पातळी सोडली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वाघ यांनी पातळी सोडून केलेल्या या विधानामुळे भाजपा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. त्यांच्या या विधानावर टीकेची झोड उठली आहे.भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ ट्विटरवर 'चौकीदार अवधूत वाघ' या अकाऊंटवरुन सक्रीय आहेत. याच अकाऊंटवरुन त्यांनी एक ट्विट करत आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची चेष्टा केली. मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या एका ट्विटला उत्तर देताना वाघ यांनी पातळी सोडली. शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका, असा इशारा मराठा क्रांती वॉरियरकडून देण्यात आला होता. या ट्विटला 'आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा...', असं उत्तर वाघ यांनी दिलं. त्यांच्या या ट्विटबद्दल अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अवधूत वाघ यांनी आधीही ट्विटरवर वादग्रस्त विधानं केली आहेत. पंतप्रधान मोदी हे विष्णूंचे अकरावे अवतार असल्याचं ट्विट वाघ यांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये केलं होतं. त्यावेळीही त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. भाजपाच्या अनेक नेत्यांनी अशी वादग्रस्त विधानं केली आहेत. तूर खरेदीबद्दल भाष्य करताना भाजपा प्रदेशाध्यक्षांनी शेतकऱ्यांचा उल्लेख 'साले' असा केला होता. तर भाजपा आमदार राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात मुलींना पळूवन आणण्याची भाषा केली होती. विधान परिषदेतील भाजपचे सहयोगी सदस्य प्रशांत परिचारक यांनी जवानांच्या पत्नींबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं.