मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला महायुती सरकारचा शपथविधी सोहळा गुरुवारी आझाद मैदान येथे पार पडला. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विविध राज्यातील मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि कलाकार मंडळीही सहभागी झाले होते. परंतु या सोहळ्यासाठी विरोधी पक्षातील एकही नेता उपस्थित नव्हता. शपथविधी सोहळ्यासाठी व्यक्तिगत निमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे, शरद पवार गैरहजर राहिले त्यावरून हीच तर महाराष्टविरोधी कोती मनोवृत्ती अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टोला लगावला आहे.
उपाध्ये यांनी ट्विट केलंय की, आझाद मैदानावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार शपथविधी झाला. या समारंभापासून व्यक्तिगत आमंत्रण देऊनही उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस नेते गैरहजर राहिले. हा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारचा शपथविधी होता. लोकशाहीत लोकांनी दिलेला कौल स्वीकारून हे नेते शपथविधीला आले असते तर खरंच या नेत्यांना महाराष्ट्र हिताची व संविधानाची जाण आहे असा अर्थ निघाला असता. महाराष्ट्राचा विकासासाठी आम्ही एक आहोत असा संदेश दिला गेला असता असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांनी लोकांचा विश्वासघात करत मविआसोबत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते. त्यापूर्वीची उदाहरणे आहेत. निवडणुका संपल्या आता विकासासाठी आपण एक आहोत हा संदेश देता आला असता. मात्र पक्षीय स्वार्थापलीकडे आम्ही काहीच पाहू शकत नाही, महाराष्ट्राच्या हिताचा कोरड्या गप्पा मारतो व वेळ आली तर विरोधातच हेच या निमित्ताने या मंडळींनी दाखवून दिले असं सांगत भाजपाने २०१९ च्या शपथविधीची आठवण करून दिली.
देवेंद्र फडणवीसांनी स्वत: केले होते फोन
शपथविधी सोहळ्यासाठी राजशिष्टाचार विभागाकडून विरोधी पक्षातील नेत्यांना आमंत्रण पाठवण्यात आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांना फोन करून निमंत्रण दिले होते मात्र महाविकास आघाडीचा एकही नेता या सोहळ्याला आला नाही. या नेत्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या पण काही वैयक्तिक कारणांनी ते येऊ शकले नाहीत अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.