Nitin Gadkari News: गेल्या काही वर्षांत शिवसेना पक्षात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळाल्या. एकनाथ शिंदे यांनी ऐतिहासिक न भूतो अशी बंडखोरी केली आणि शिवसेना पक्षात मोठी फूट पडली. यानंतर अतिशय वेगवान घडामोडी घडल्या आणि महाविकास आघाडी सरकार पडले. एकनाथ शिंदे यांनी थेट शिवसेना पक्षावरच दावा केला आणि भाजपासोबत महायुतीचे सरकार आले. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने जोरदार मुसंडी मारली आणि शिवसेना ठाकरे गटाला केवळ २० जागांवर समाधान मानावे लागले. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या पक्षाला एकही जागा मिळाली नाही. अशातच बाळासाहेब ठाकरे यांचा खरा उत्तराधिकारी कोण, असा प्रश्न अनेकदा राजकीय वर्तुळात चर्चिला जातो. यावर भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तर दिले.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गटाला संपूर्ण राज्यातून एकामागून एक धक्के बसताना पाहायला मिळत आहे. अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत असून, शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत आहेत. आगामी महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला लागलेली गळती उद्धव ठाकरेंसाठी मोठे आव्हान मानले जात आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे भाजपा महायुतीसोबत जाऊन महापालिका निवडणुका लढवू शकतात, असा कयास अनेक जण बांधताना दिसतात. तर कधी शिवसेना शिंदे गट आणि मनसे एकत्रित होतील आणि राज ठाकरे या पक्षाचे नेतृत्व करतील, असेही दावे राजकीय वर्तुळात केले जातात. यातच नितीन गडकरींनी यावर भाष्य केले.
उद्धव ठाकरे, राज ठाकरे की एकनाथ शिंदे, बाळासाहेबांचा उत्तराधिकारी कोण?
बाळासाहेब ठाकरे यांचा उत्तराधिकारी म्हणून उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या तिघांपैकी एकाची निवड करण्यास नितीन गडकरी यांना सांगण्यात आले. मात्र नितीन गडकरी यांनी थेट एकाची निवड केली नाही. यावर उत्तर देताना बाळासाहेबांना माझ्याबद्दल खूप प्रेम होते आणि या तिघांशी माझे चांगले संबंध आहेत. बाळासाहेब यांचा उत्तराधिकारी कोण हे जनता ठरवेल. माझे तिघेही मित्र आहेत आणि राजकारण वेगळे आणि तिघांचे संबंध वेगळ्या पातळीवरचे आहेत, असे उत्तर दिले. तसेच महाराष्ट्राचा बेस्ट सीएम कोण? एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? या प्रश्नावर बोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, दोन्हीही चांगले आहेत. परंतु, माझ्या नजरेत देवेंद्र फडणवीस यांनी खूप चांगले काम केले आहे आणि आता ही चांगले काम करीत आहेत, असे गडकरी म्हणाले. ते टीव्ही९ मराठीच्या कार्यक्रमात बोलत होते.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर त्यांचा वारसा पुढे नेण्यावरून वाद असल्याची चर्चा आहे. काही जण बाळासाहेब ठाकरे यांचा खरा उत्तराधिकारी म्हणून त्यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांना मानतात. परंतु, या वारसदाराच्या यादीत ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे हेही आहेत. राज ठाकरेंचे व्यक्तिमत्व, भाषण आणि बोलणे बाळासाहेबांप्रमाणेच रोखठोक आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर आणखी एक वारसदार म्हणून एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व पुढे आले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि नाव यावरच दावा करत आपणच बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक म्हणून वारसदार आहोत, असे म्हटले आहे.