ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 20 - सध्या शिवसेना व भाजपाकडून आरोपप्रत्यारोप केले जात आहेत. महाराष्ट्रातील सरकार हे निजाम किंवा रझाकारांचे नाही तर महायुतीचे सरकार आहे. हे दोन्ही पक्ष असेच भांडत राहिल्यास आगामी २०१९ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला सत्ता गमवावी लागेल असा इशारा रिपाइंचे अध्यक्ष तथा खासदार रामदास आठवले यांनी पत्रपरिषदेत दिला.पक्षाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय संकल्प शिबिर व उमवित आयोजित कार्यक्रमासाठी ते सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.वादापेक्षा विकासावर भर द्या...खासदार आठवले म्हणाले, शिवसेना व भाजपा हे एकमेकांचा निजाम आणि रझाकार असा उल्लेख करीत आहे. शिवसेना व भाजपा हे आमचे मित्रपक्ष आहेत. त्यांनी वाद थांबवून विकासावर भर देणे गरजेचे आहे. राज्यात सिंचनाचे प्रश्न मोठ्या प्रमाणात रखडले आहेत. काही दिवसांपूर्वी आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुंबई व कोकण परिसरात पडणारा पाऊस अडवून त्याचा कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागात सिंचनासाठी उपयोग करण्याबाबत पत्र दिले आहे. दुष्काळी स्थिती गंभीर आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्ह्याला रेल्वेने पाणी पोहचविण्याची वेळ आली आहे. या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची गरज नव्हती...माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यावर अंजली दमानिया यांच्यासह काही जणांनी आरोप केले. मात्र झालेल्या आरोपांची शहानिशा होणे गरजेचे होते. त्यामुळे खडसे यांच्या राजीनाम्याची गरज नव्हती. मुख्यमंत्रीपदासाठी ते इच्छुक होते. नंतरच्या काळात त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली. पक्षाने त्यांना महत्त्वाची खातीदेखील दिली. त्यामुळे तसा काही वाद नव्हता. मात्र त्यांनी आता राजीनामा दिलाच आहे तर चौकशी तत्काळ पूर्ण होणे गरजेचे आहे. विरोधकांनी काम करू द्यावे...लोकशाहीत विरोधकांनादेखील सत्ताधाऱ्यांच्या बरोबरीने महत्त्व आहे. त्यामुळे त्यांनी मंत्र्यांना काम करू द्यावे. विरोधकांनी केवळ आरोप करण्यात वेळ खर्च करू नये असा सल्लाही आठवले यांनी दिला. लोकसभेत जी.एस.टी.विधेयक हे अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. पंतप्रधानांनी या विधेयकात दुरुस्ती करण्याबाबत आश्वासन देखील दिले. मात्र तरीही विरोधक कामात अडथळा आणत असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदी सरकार हे योग्य दिशेने काम करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजप-सेना भांडत राहिल्यास २०१९ मध्ये सत्ता गमावणार - रामदास आठवले
By admin | Updated: June 20, 2016 18:46 IST