Nitin Gadkari : "चंद्रशेखर बावनकुळेंनी बायको पळवून आणली..."; नितीन गडकरींनी सांगितलं सीक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 06:28 PM2022-08-13T18:28:47+5:302022-08-13T18:40:33+5:30

BJP Nitin Gadkari And Chandrashekhar Bawankule : "चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कारकिर्दीची सुरुवात ऑटोरिक्षा ड्रायव्हर म्हणून झाली."

BJP Nitin Gadkari revealed Chandrashekhar Bawankule secret | Nitin Gadkari : "चंद्रशेखर बावनकुळेंनी बायको पळवून आणली..."; नितीन गडकरींनी सांगितलं सीक्रेट

Nitin Gadkari : "चंद्रशेखर बावनकुळेंनी बायको पळवून आणली..."; नितीन गडकरींनी सांगितलं सीक्रेट

googlenewsNext

राज्यातील सत्तांतरानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे मंत्री झाल्याने आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण याची चर्चा जोरात सुरू असतानाच माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे यांची नियुक्ती करण्यात आली तर मुंबई भाजपाच्या अध्यक्षपदी आशिष शेलार यांची वर्णी लागली आहे. यानंतर नागपूरमध्ये बावनकुळे यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे इतर महत्वाचे नेते उपस्थित होते. याच दरम्यान नितीन गडकरी यांनी बावनकुळे यांचं एक सीक्रेट सांगितलं आहे. 

"चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कारकिर्दीची सुरुवात ऑटोरिक्षा ड्रायव्हर म्हणून झाली. बाकीचं ते सांगत नाहीत. बायको सुद्धा त्यांनी पळवून आणली. तुम्हाला माहिती नसेल त्यांची बायको कुणबी समाजाची आहे आणि ते तेली समाजाचे आहेत. त्यांनी कसं केलं ते तुम्हाला सांगतील. ते सीक्रेट तरुण कार्यकर्त्यांच्या उपयोगाचं आहे. पण जेष्ठ कार्यकर्त्यांनी या भानगडीत पडू नये" असं म्हणत गडकरींनी मजेशीर किस्सा सांगितला. तसेच "बावनकुळे यांचं जीवन हे संघर्षमय होतं. त्याचे वडील, त्याचे भाऊ गरिबीची परिस्थिती होती. कोराडीच्या प्रकल्पात त्यांची जमीन गेली. त्यावेळी संघर्ष करून त्यांनी ती मिळविली. बावनकुळेंनी छत्रपती सेनेचं काम सुरू केलं. प्रकल्पग्रस्तांसाठी आंदोलन केलं."

"भाजपाची जिल्ह्यातील तेव्हाची स्थिती चांगली नव्हती. चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. त्यानंतर स्वत:च्या कर्तृत्वाने त्यांनी कामठी मतदारसंघ मजबूत केला. जिल्ह्यात भाजपा भक्कम करण्याचं काम बावनकुळे यांनी केलं. त्यासाठी खूप मेहनत घेतली, परिश्रम केले" असंही नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. "आपल्यातला एक कार्यकर्ता आज महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहे. तुम्हाला माहितच आहे जो प्रदेशाचा अध्यक्ष होतो तो पुढे काय काय होतो. म्हणजे मी मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा देत नाहीय बरं, नाहीतर मीडियामध्ये माझ्या नावानं जे मी बोललो नाही ते माझ्या नावावर खपवून देतात. फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजेत, पण ते केंद्रात गेल्यावर नंतर बावनकुळे तुमचा विचार होऊ शकतो", असं नितीन गडकरी मिश्किलपणे म्हणाले. 

"बावनकुळेंना येणाऱ्या काळामध्ये पक्षाची सेवा करण्याची संधी आहे. तसंच त्यांच्या कतृत्वालाही वाव मिळणार आहे. हा पक्ष कार्यकर्त्याचा पक्ष आहे. पिता-पुत्राचा किंवा आई-मुलाचा हा पक्ष नाही. एक ऑटोरिक्षा चालवणारा सामान्य माणूस आज महाराष्ट्राचा अध्यक्ष झाला तो आपल्या कतृत्वानं आणि कामानं. हे भाजपाचं वैशिष्ट्य आहे. एका कार्यकर्त्याचा सन्मान होणं हे माझ्यासहीत देवेंद्र फडणवीसांसहीत सर्व कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा विषय आहे", असं नितीन गडकरी म्हणाले. 
 

Web Title: BJP Nitin Gadkari revealed Chandrashekhar Bawankule secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.