BJP Nitesh Rane News: राज्यातील साडेतीन शक्तिपीठ, दोन ज्योतिर्लिंग आणि पंढरपूर, अंबेजोगाईसहित १८ तीर्थक्षेत्रांना जोडणारा शक्तिपीठ महामार्ग प्रकल्प महामंडळामार्फत राबवण्यात येणार असून, या प्रकल्पाच्या आखणीस तसेच भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. परंतु, यानंतर शक्तिपीठ महामार्गाला असलेला विरोध तीव्र झाला आहे. राज्यातील १२ जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला विरोध असून, विविध ठिकाणी निदर्शने, आंदोलन करण्यात येत आहे. यातच शक्तिपीठ महामार्ग विकासासाठी असल्याचे मत भाजपा नेते आणि आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केले आहे.
पत्रकारांशी बोलताना नितेश राणे म्हणाले की, शक्तिपीठ महामार्गसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. त्यामुळे प्रत्येकाला विश्वासात घेऊनच महामार्ग होणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी बैठक झाली असून, लोकांना विश्वासात घेऊन काम सुरू करायचे आहे. आम्हाला दोन ते तीन पर्यायी मार्ग दाखवा. आता जो शक्तिपीठ महामार्गाचा प्लॅन आहे, बांदा शहर आणि काही भाग बाधित होत आहे. आता जो हायवे थेट गोव्यामध्ये बाहेर निघत आहे, ज्या हायवेचे टोक गोव्यात जात असेल तर महाराष्ट्राला आणि सिंधुदुर्गला काय फायदा, असा सवाल नितेश राणे यांनी केला.
आताचा प्लॅन आम्ही १०१ टक्के बदलणार
आता जो प्लॅन आहे आम्ही १०१ टक्के बदलणार आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी आणि कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आहे. दोन पर्याय आम्ही सुचवले आहेत. झिरो पॉईट किंवा मळगाव इथून शक्तिपीठ महामार्ग निघू शकतो. काही शेतकऱ्यांच्या शेतीतून महामार्ग जात असेल त्यांना योग्य मोबदला दिला जाईल. विरोध करण्याची काही नौटंकी सुरू आहे. आम्ही लोकांमध्ये निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहोत. लोकांची चिंता आम्हाला जास्त आहे. ज्यांना लोकांनी नाकारले आहे, त्यांना घरी बसवले आहे, त्यांनी लोकांची माथी भडकवायचा प्रयत्न करू नये. त्याचे काही प्रश्न असतील तर त्यांच्याशी संवाद करायला तयार आहे, असे नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी आहे. तो मार्ग गोव्याकडे न जाता झिरो पॉईट किंवा मळगाव जाईल या पद्धतीने सुचवणार आहे. कोस्टल रोड मार्गे रेडी बंदरकडे गेला तर अजून लोकांचा फायदा होईल आणि विकासाची दालने उघडतील. नारायण राणे, दीपक केसरकर यांच्यासह आम्हाला लोकांचा विकास करण्यासाठी निवडून दिलेले आहे, असे राणे म्हणाले.