या जन्मीचं कर्म याच जन्मात फेडावं लागतं; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 22:54 IST2022-04-08T22:53:15+5:302022-04-08T22:54:20+5:30
आज जे सत्तेत आहेत. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले. त्यांचा विसर सरकारला पडला आहे असं उदयनराजेंनी म्हटलं आहे.

या जन्मीचं कर्म याच जन्मात फेडावं लागतं; शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया
कोल्हापूर – राज्यात एसटी कामगारांचा संप गेल्या ४ महिन्यापासून सुरू आहे. मात्र शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांचा संप चिघळला. संतप्त एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक घरावर हल्ला केला. या हल्ल्याचे पडसाद राज्यभर उमटले. पवारांच्या घरावरील हल्ल्याचा महाविकास आघाडीच्या नेत्यासह भाजपा नेत्यांनीही निषेध केला. या हल्ल्यामागे कोण आहेत ते शोधून काढा असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.(Attack on Sharad Pawar House)
शरद पवारांच्या घरावर हल्ल्यावर पत्रकारांनी छत्रपती उदयनराजे भोसले(Udayanraje Bhosale) यांना प्रश्न विचारला असता. ते म्हणाले की, काय सांगायचं? माझ्याकडून काय अपेक्षित आहे. मी असं बोललं पाहिजे बरं झालं, चांगले केले. अजून दगडं मारायला पाहिजे. फार छोटा विचार आहे. कर्म असतं, जे आपण या जन्मी करतो तेच आपल्याला फेडावं लागते. हे माझ्यासह सर्वांनाच लागू आहे. यावर अजून काय बोलणार? असं भाष्य त्यांनी केले आहे.
तसेच देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री काळात चांगले काम केले. तेव्हा शिवसेनाहीसोबत होती. आज जे सत्तेत आहेत. ज्या मतदारांनी त्यांना निवडून दिले. त्यांचा विसर सरकारला पडला आहे. नाराजी दूर करण्यातच सरकारचा वेळ जात आहे. विकास थांबला आहे. त्याचे परिणाम आपल्या पुढच्या पिढीला भोगावे लागणार आहेत. सत्ता कोणाचीही असो लोकांच्या विकासावर गदा येता कामा नये. लोकशाहीच्या प्रक्रियेत निवडणुका अटळ आहेत. कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक महाराष्ट्राच्या प्रगतीला उत्तर देणारी असेल असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, प्रत्येकाने सोयीप्रमाणे मतांची पेटी बनवली आहे. समाजासमाजात तेढ निर्माण केले जात आहेत. महाराजांच्या नावावर शिवसेनेची स्थापना झाली. मात्र त्यांनीही सर्व लोकांना एकत्र ठेवण्याचा विचार केला नाही. महाराजांचा विचार आचरणात का आणत नाही? माझं मत ठाम आहे. जे योग्य ते मी मांडत असतो. मूठभर लोकांचा स्वार्थ साधायचा. मूठभर लोकांची प्रगती करायची हे सुरू आहे असंही उदयनराजेंनी सांगितले.