नंदूरबार - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच महायुतीतील वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहे. त्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार विजयकुमार गावित यांनी शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय असं सांगत आमदार आमश्या पाडवी यांच्याबाबत गंभीर आरोप केला.
विजयकुमार गावित म्हणाले की, माझ्या टार्गेटवर २ जण आहेत. एक आमदार चंद्रकांत रघुवंशी तर दुसरे आमश्या पाडवी. यांना जास्त मस्ती आलीय, ती जिरवायची आहे. आमदार आमश्या पाडवी यांच्या नावावर १२ फ्लॅट आहेत, पत्नीच्या नावे ४ बंगले आहेत. केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेतून आणि राज्य सरकारच्या शबरी घरकुल योजनेतून घरकुलाचा लाभ घेतले आहेत. शिंदेचे आमदार युतीत राहून नेहमी विरोध करतात. मी आता त्यांना जागा दाखवणार आहे. त्यांना सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं.
याआधी भाजपा आमदार परिणय फुके यांनी शिवसेनेचा बाप मीच अशी टीका केली होती. भंडारा येथील स्थानिक निवडणुकीत भाजपा-शिंदेसेनेतील वाद उफाळून आला. फुके यांच्यावर शिंदेसेनेने आरोप केला होता. त्यानंतर फुके यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली. माझ्यावर अनेक लोक आरोप करतात. मी कुठल्याही आरोपाला उत्तर देत नाही. जर एखादा मुलगा परीक्षेत चांगले मार्क्स मिळवत असेल तर त्याची नाहीतर आईचं कौतुक केले जाते. काही चांगले झाले तर आईने केले किंवा त्या मुलाने केले. याउलट जर काही वाईट झाले तर दोष बापावर केला जातो. त्यामुळे मला पक्कं माहिती झालं, शिवसेनेचा बाप मीच आहे. खापर माझ्यावर फोडले जाते असं त्यांनी विधान केले होते. त्यानंतर आता भाजपा नेत्यांनी शिंदे आमदारांवर कठोर टीका केली आहे.
जालन्यातही भाजपा-शिंदेसेनेत जुंपली
दरम्यान, अलीकडेच काँग्रेसचे माजी आमदार कैलास गौरंट्याल यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या प्रवेशानंतर त्यांनी शिंदेसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्यावर निशाणा साधला. माझ्याकडे त्यांच्या एवढ्या फाईल्स आहेत, मी जर तोंड उघडले तर फार पंचाईत होईल. मी पुराव्यासह बोलतो. त्याने सुरुवात केली की मी बोलणार, तो माझ्या नादी लागला तर मी सोडणार नाही. महायुती म्हणून मी काम करणार आहे. मात्र कुणीही मला कमी लेखण्याचा प्रयत्न केला तर मी तसेच प्रत्युत्तर देणार आहे. मी सुरुवात करणार नाही परंतु पुढून सुरू झाले तर मी संपवणार आहे.मी १०० प्रकरणे काढून दाखवू असं गोरंट्याल यांनी खोतकरांबाबत म्हटलं होते. त्याशिवाय आगामी निवडणूक भाजपाने स्वबळावर लढवावी अशी मागणीही केली होती.