कोणाच्याही नादी लाग, पण या रगेलच्या नादी लागू नको; गंभीर आरोप करणाऱ्या मिटकरींना सुरेश धस यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 17:14 IST2024-12-27T17:13:28+5:302024-12-27T17:14:01+5:30

Beed Murder Case: अमोल मिटकरी यांच्या आरोपाला आमदार धस यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

bjp mla Suresh Dhas warns ncp amol Mitkari who makes serious allegations | कोणाच्याही नादी लाग, पण या रगेलच्या नादी लागू नको; गंभीर आरोप करणाऱ्या मिटकरींना सुरेश धस यांचा इशारा

कोणाच्याही नादी लाग, पण या रगेलच्या नादी लागू नको; गंभीर आरोप करणाऱ्या मिटकरींना सुरेश धस यांचा इशारा

MLA Suresh Dhas ( Marathi News ) :बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आता महायुतीतील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादीकडून प्रवक्ते व आमदार अमोल मिटकरी यांनी धस यांच्यावर गंभीर आरोप केले. "संजय राऊत व सुरेश धस यांनी यात उपमुख्यमंत्री अजितदादाना टार्गेट करने सुरू केले आहे. या हत्याकांडातील आरोपी फासावर गेले पाहिजेत, ही धनंजय मुंडे साहेबांची सुरुवातपासून भूमिका असताना या प्रकरणात धनंजय मुंडे यांचं राजकारण संपवण्याची सुपारी घेतल्याच्या भूमिकेत धस आले आहेत," असा हल्लाबोल मिटकरी यांनी केला होता. मिटकरी यांच्या या आरोपाला आमदार धस यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

"अमोल मिटकरी फार लहान आहे. माझी त्याला एकदा विनंती आहे की, अमोल तू कोणाच्याही नादी लाग पण या रगेलच्या नादी लागू नको. तुला लै महागात पडेन. मी एकदा आता त्याचं ऐकून घेतो. वडीलकीच्या नात्याने त्याला एकदा समज देतो. तुझं कोणीकडेही दुकान चालव, पण माझ्याकडे दुकान चालवू नको," असा इशारा सुरेश धस यांनी दिला आहे.

मिटकरींनी पुन्हा डिवचलं

सुरेश धस यांनी पलटवार करताच अमोल मिटकरी यांनी पुन्हा सोशल मीडियावर पोस्ट लिहीत धस यांना डिवचलं आहे. "आमदार सुरेश धस यांच्या धमकीला पोलिसांनी गांभीर्याने घ्यावं. महागात पडेल म्हणजे काय? यावरून यांची एकंदरीत कारकीर्द लक्षात येते. गृह विभाग व पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन धस यांच्यावर योग्य ती कारवाई करावी," अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे.

दरम्यान, "केवळ पंकजाताई व धनंजय मुंडे हे दोघे बहीण भाऊ एकत्र आल्याने महायुतीचे व विरोधातील आमदार एकत्र येऊन आमदार सुरेश धस यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांच्या राजकीय कारकिर्दीला संपवण्याचं पद्धतशीर काम करत आहेत. त्यासाठी एक सामाजिक कार्यकर्त्या कामाला लावल्या आहेत," असा हल्लाबोलही आमदार मिटकरी यांनी केला आहे.
 

Web Title: bjp mla Suresh Dhas warns ncp amol Mitkari who makes serious allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.