Prasad Lad clarification: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या विधानामुळे झालेल्या वादावर अखेर प्रसाद लाड यांचे स्पष्टीकरण, काय म्हणाले वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2022 03:05 PM2022-12-04T15:05:49+5:302022-12-04T15:06:37+5:30
कोकणातील एका कार्यक्रमात त्यांच्या एका विधानामुळे वादाला तोंड फुटलं होतं.
Prasad Lad clarification over Chatrapati Shivaji Maharaj Controversy: काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यावरुन राज्यभरात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या विधानाचा तीव्र निषेध करत कारवाईची मागणी केली आहे. त्यातच नुतकेच भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी कोकण महोत्सवादरम्यान, छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या विधानामुळे नवा वाद सुरू झाला आहे. शिवरायांचा जन्म कोकणात झाल्याचे विधान त्यांनी केल्याचा व्हिडीओ राष्ट्रवादीने ट्विट केला असून त्यावरून त्यांच्या टीकेची झोडही उठवली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला, असं वक्तव्य भाजप आमदार प्रसाद लाड यांनी शनिवारी मुंबईतील कोकण महोत्सवामध्ये बोलताना केले. यावरुन टीका सुरू झाल्यावर आता त्यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे. "छत्रपती शिवराय हे संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत आहेत. महाराजांची कर्मभूमी कोकण होती, स्वराज्याची मुहूर्तमेढ कोकणात रोवली गेली हे देखील विसरून चालणार नाही, अनावधानाने माझ्याकडून दुसरा शब्द प्रयोग झाला. परंतु त्वरित चूक दुरुस्त केली. विश्वाचे आराध्य दैवत शिवरायांचा सन्मान आम्ही यापुढेही ठेवणार! कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो," असे स्पष्टीकरण त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून दिले.
नक्की काय घडलं होतं?
मुंबईतील कोकण महोत्सवात बोलताना शनिवारी आमदार प्रसाद लाड यांनी विधान केले. 'स्वराज्यभूमी कोकण महोत्सव कशासाठी हे तुम्ही विचाराल, हिंदवी स्वराज्याची स्थापन छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा कोकणात झाला. यानंतर रायगडावर त्यांचे बालपण गेले, त्यांची सुरूवात कोकणात झाली," असे आमदार प्रसाद लाड बोलत असल्याचे दिसले. याचा व्हिडीओ ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली. मात्र, आपण त्या विधानाची दुरूस्ती नंतर लगेच केली असल्याचा दावा लाड यांनी फेसबुक पोस्टमधील व्हिडीओमध्ये केला आहे.