मीरारोड- मीरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेतील ठेका कामगारांची भाजपा प्रणित श्रमिक जनरल कामगार संघटनेने शुक्रवारी बंद केला. अचानक बस सेवा बंद झाल्याने नागरिकांचे तसेच शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे बस नसल्याने अतोनात हाल झाले.
मीरा भाईंदर महापालिकेने परिवहन सेवा ठेकेदारांना चालवण्यास दिली आहे. इलेक्ट्रिक ५७ बस ह्या ट्रान्सवॉल्ट मीरा भाईंदर ह्या ठेकेदारास तर ७४ डिझेल बस ह्या महालक्ष्मी सिटी बस ह्या ठेकेदारास चालवण्यास दिली आहे. बसचालक, प्रवर्तक सदर ठेकेदारांचे आहेत. तर बस वाहक, निरीक्षक हे वंश इन्फोटेक ह्या ठेकेदाराचे आहेत. तिन्ही ठेकेदारांचे मिळून सुमारे ६५० ठेका कमर्चारी आहेत.
भाजपा आमदार नरेंद्र मेहता अध्यक्ष असलेल्या श्रमिक जनरल कामगार संघटनेने शुक्रवारी काम बंद आंदोलन केले व शहरातील बस सेवा बंद पाडली. घोडबंदर येथील परिवहन डेपोच्या प्रवेशद्वारावरच भाजपा प्रणित संघटनेच्या कामगारांनी ठिय्या मारला. आ. नरेंद्र मेहता हे तेथे आले व त्यांनी कामगारांशी आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पालिकेला अनेकदा सांगून देखील बोनस, विमा, वाहतूक कोंडीत विलंब होत असल्याचा मोबदला आदींवर निर्णय होत नसल्याने बस सेवा नाईलाजाने बंद करावी लागली असे ते म्हणाले. मेहतांनी पालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांना ह्यासाठी जबाबदार ठरवत टीका केली.
संघटनेने, ठेकेदार बोनस देत नाही तो पर्यंत बस सुरु करणार नाही असा पावित्रा घेतला. अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, विभाग प्रमुख स्वप्नील सावंत आदींची ठेकेदार यांच्या सोबत बैठक झाली. यावेळी वंश आणि ट्रान्सवॉल्ट ह्या ठेकेदारांनी बोनस रक्कम अदा केल्याचे सांगितले. तर महालक्ष्मी सिटी यांनी, बोनस लागू होतो कि नाही ? या बाबत पालिकेला मार्गदर्शन मागून पण दिले नाही. तसेच आधीचा फरक, अवास्तव व मनमानी आकारलेला दंड आदींचा निर्णय घेण्यास सांगितले.
मात्र ठेकेदाराने बोनसची रक्कम कामगारांना देण्याचे निर्देश अधिकारी यांनी दिले. बस सेवा बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत असल्याने पालिकेवर टीकेची झोड उठू लागल्याने प्रशासनाचा दबाव ठेकेदारांवर होता. अखेर बोनसची रक्कम महालक्ष्मी यांनी देखील जमा केली. त्या नंतर सुमारे ३ च्या दरम्यान बस सेवा सुरु झाली.
दरम्यान शुक्रवारी बस सेवा अचानक बंद झाल्याने कामा साठी निघालेल्या नागरिकांना तसेच शाळा - महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगलाच फटका बसला. बस साठी बराच वेळ ताटकळत नागरिक व विद्यर्थी होते. मात्र बस येत नसल्याचे समजल्याने शेवटी नाईलाजाने जास्त पैसे मोजून रिक्षाने जावे लागले. तर काहींनी टेम्पो वा अन्य मिळेल ते वाहन पकडले.
श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल म्हणाले कि, परिवहन सेवेत ठेका कामगारांना काम आणि ड्युटी साठी घाबरवून ठेवले जात आहे. कामगारांच्या न्याय मागण्या सोडवण्या ऐवजी भाजपा प्रणित संघटनेने त्यांना वेठीस धरून बंद करायला लावला आहे.
मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी कामगारांवरचा अन्याय आणि नागरिकांचे केले गेलेले हाल ह्याला पालिका व सत्ताधारी आणि त्यांची कामगार संघटना जबाबदार असल्याचा आरोप केला. ठेका देताना चालणारे गैरप्रकार आणि दबाव टाकून चुकीचे करार बनवून अडवणूक केली जात असल्याचे राणे म्हणाले.
अचानक बस सेवा बंद [पाडून लोकांचे होणारे हाल पाहून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी घोडबंदर डेपो येथे जाऊन बस सुरु करण्याची मागणी केली. सामंत व कांबळे यांनी आ. मेहता व त्यांच्या कामगार संघटनेवर तसेच पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठवली. सामान्य नागरिकांना मनमानी व दडपशाही करून वेठीस धरल्याचा आरोप करत कारवाईची मागणी केली.
सरकार जनतेच्या हिता साठी कटिबद्ध आहे. बेकायदा संप पुकारून सामान्य नागरिक व विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या अश्या अराजक निर्माण करणाऱ्या संघटनांवर बंदी घालून गुन्हा दाखल करण्यास महापालिका आयुक्तांना सांगितले आहे, असे राज्याचे पहिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.