अमर,अकबर,अँथनिचा संसार व्यवस्थितपणे चालवा: रावसाहेब दानवे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 17:33 IST2020-01-13T17:28:22+5:302020-01-13T17:33:31+5:30
जसा बॉल आला तसा टोलावा लागतो, असे म्हणत दानवेंनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला.

अमर,अकबर,अँथनिचा संसार व्यवस्थितपणे चालवा: रावसाहेब दानवे
जालना : शिवसेना,काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षाने एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले आहे. त्यांनतर तीन चाकी सरकार जास्त काळ टिकणार नसल्याची टीका भाजपच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. तर भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी सुद्धा याच मुद्यावरून ठाकरे सरकारला खोचक टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा जालन्यात सर्वपक्षीय नागरिक सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी नेहमीप्रमाणे रावसाहेब दानवेंनी चांगली फटकेबाजी केली. तुमचा अमर, अकबर,अँथनीचा संसार चांगला चालवा. अन्यथा अर्ध्यावरच डाव मोडला असे म्हणण्याची संधी आम्हाला देवू नका असा खोचक सल्ला त्यांनी यावेळी दिला.
तर तुमचा सारा खेळ खेळून घ्या. आम्ही तुमच्यासमोर अडथळे निर्माण करणार नाही. मात्र फक्त तुमच्यातचं अडथळे होवू देवू नका, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला.
तसेच चित्रपट, राजकारण आणि क्रिकेटमध्ये आपल्याला संधी मिळावी असे सर्वांचं वाटत असते. मात्र चित्रपटात रिटेक करता येतो तर क्रिकेटमध्ये सुद्धा सराव करता येतो. पण राजकारणात असे होत नसते .कारण येथे जसा बॉल आला तसा टोलावा लागतो, असे म्हणत दानवेंनी ठाकरे सरकारचा चांगलाच समाचार घेतला.