Maharashtra News: वक्फ सुधारणा विधेयकावरून भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचल्यानंतर खासदार संजय राऊतांनी उलट सवाल केला. राऊतांनी फडणवीसांना सवाल केल्यानंतर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी संजय राऊतांना सुनावले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
वक्फ सुधारणा विधेयकांवरून महाराष्ट्रातही विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लक्ष्य केले. संजय राऊतांनी जुन्या घटनांचा दाखला देत फडणवीसांना डिवचले.
वाचा >> केंद्रीय आणि राज्य वक्फ परिषदेमध्ये किती महिला आणि इतर धर्मीय लोक असणार?
खासदार संजय राऊतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी तुम्हाला हिरवी कावीळ झालीये म्हणत उत्तर दिले आहे.
रविंद्र चव्हाण संजय राऊतांवर उत्तर देताना काय बोलले?
रविंद्र चव्हाण यांनी संजय राऊत यांचे ट्विट रिपोस्ट करत म्हटलं आहे की, "संजयजी, 'हिरवी कावीळ' झालेल्या ज्या नव्या दिव्य दृष्टीतून तुम्ही बघता, त्यातून तुम्हाला वक्फ बोर्ड आणि हिंदुत्वाचा संबंध नाही, असं वाटणं साहजिकच आहे. पण..."
"वक्फ बोर्डाची हिंदूंच्या विरोधातील मनमानी खरंच जाणून घ्यायची इच्छा असेल, तर देशभरातील हिंदू मंदिरं आणि ज्या सर्वसामान्य हिंदूंची घरं वक्फ बोर्डाने बळकावली आहेत, त्यांना विचारा. ते 'वक्फग्रस्त' हिंदू ज्या शोकांतिका सांगतील, त्या ऐकून तरी तुमच्या मनाला पाझर फुटेल अशी आशा", अशा शब्दात चव्हाणांनी राऊतांना उत्तर दिले आहे.
"बाकी काँग्रेसच्या पाठिंब्यावरचं बांडगुळ झालाय तुमचा पक्ष... तेव्हा 'मालकीणबाईं'च्या सासूबाईंचं कोडकौतुक सुरू राहू देत", असे म्हणत चव्हाणांनी काँग्रेससोबत आघाडी केल्याच्या मुद्द्यावरून पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेला डिवचले.
देवेंद्र फडणवीस काय बोलले होते?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी १ एप्रिल रोजी एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी म्हटले होते की, "वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?", अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंना लक्ष्य केले होते.