BJP Nilesh Rane News: जगभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शिवजयंतीनिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून देशभरातली अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही एक्स पोस्टवरुन शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने शुभेच्छा मोठी चूक केली आहे. यावरून विरोधकांकडून राहुल गांधी यांच्यावर टीका केली जात आहे. यातच, राहुल गांधी आणि काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील, असे राहुल गांधी यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवरायांना आदरांजली वाहण्याऐवजी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता या पोस्टवरुन नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. पत्रकारांशी बोलताना भाजपा नेते निलेश राणे यांनी या मुद्द्यावरून राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.
महाराजांचा अपमान केला, राहुल गांधी अन् काँग्रेसने माफी मागावी
मी दरवर्षी शिवप्रेमी म्हणून सिंधुदुर्ग किल्ल्यावर येतो. तेथे छत्रपती शिवाजी महाराजांसमोर नतमस्तक होतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले सर्वांचे दैवत आहेत. हा दिवस उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा, असे सांगत निलेश राणे यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या पोस्टवरून टीका केली आहे. खरे तर राहुल गांधी जे भाषण करतात, त्यावरून मानसिक संतुलन बिघडल्यासारखे वाटते. ते जे भाषण करतात ते चीनची बाजू घेऊन करतात. आपल्या देशाचे काही चांगले व्हावे असे त्यांना वाटत नाही. ते परदेशात जरी गेले तरी भारताची बदनामी करतात. मूळात राहुल गांधी भारतीय नाही. फक्त त्याचा पासपोर्ट भारतीय आहे. ज्याला आदरांजली आणि श्रद्धांजली यातील फरक माहिती नाही, संस्कृती माहिती नाही, छत्रपती शिवाजी महाराज माहिती नाहीत, आपला इतिहास माहिती नाही आणि कोणीतरी ट्विट लिहून देते. या व्यक्तीबरोबर मी काम केले आहे. नेता बनवण्याचा एकही गुण त्यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे अभ्यास नाही. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या तरी विषयाचा अभ्यास करावा लागतो. त्यांच्याकडे कुठलेच गुण नसल्याने त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने माफी मागायला हवी, अशी मागणी निलेश राणे यांनी केली.
दरम्यान, जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात. पण राहुल गांधी हे नेहमीच देशातील आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या महापुरुषांविषयी कळत नकळत अनादर व्यक्त करत असतात. त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे. ही पोस्ट त्यांनी तात्काळ मागे घ्यावी. आदरांजली शब्दाचा वापर करावा अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी दिला.