… हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन सगळीकडे पेटवत फिरणार का? राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 17:48 IST2023-05-06T17:47:34+5:302023-05-06T17:48:50+5:30
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसूतील रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांची भेट घेतली.

… हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन सगळीकडे पेटवत फिरणार का? राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बारसूतील रिफायनरीला विरोध करणाऱ्या लोकांची भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचंही पाहायला मिळालं. यावरून भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
“उद्धव ठाकरे आज स्वत: कोण आहेत याची त्यांना जाणीव आहे का माहित नाही. ते म्हणतात हुकुमशाही करून प्रकल्प केला तर आम्ही महाराष्ट्र पेटवू म्हणतात. ४० गेले राहिले १०-१२ आहेत. शिवसेनेची अवस्था आज राज्यातील देशातील कमी ताकदीचा पक्ष शिवसेना आहे. आपल्याला दीर्घकाळ चालता येत नाही. कोणावर हात वर करू शकत नाही, तरीही पेटवूच्या भाषा का? जेमतेम ते मुख्यमंत्री होते. मंत्रायलातल्या कर्मचाऱ्यांनीही सांगितलं इथले मुख्यमंत्री दोनदा आले. जेमतेम तासभर बसायचे आणि जायचे. पेटवायला कुठे आणि कधी फिरणार? का हेलिकॉप्टरमधून मशाल घेऊन पेटवत फिरणार?” असा खोचक टोला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लगावला.
“महाराष्ट्रात इतके नेते आहेत, प्रकल्पाला विरोध करणारे नेते किती? मी कोकणातला आहे. एनरॉन, जैतापूरला विरोध, हायवेला, सिंधुदुर्गात विमानतळ आलं जागा घेण्याच्या प्रक्रियेलाही विरोध, आजवर कोकणातल्या प्रत्येक प्रकल्पाला शिवसेनेनं विरोध केलाय. कोकणाबद्दल आस्था, प्रेम आहे की द्वेष आहे. यांनी गेल्या अडीच वर्षात कोकणात कोणताही प्रकल्प आणला नाही. यांचं कोकणाच्या विकासात योगदान काही नाही,” असा आरोपही त्यांनी केला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
इतके प्रकल्प बाहेर नेले. आता हा रिफायनरी प्रकल्प गुजरातला न्या. आणि महाराष्ट्रातून पळवलेले वेदांता, एअरबस महाराष्ट्राला द्या. कोकणात राख आणि गुजरातमध्ये रांगोळी हे अजिबात चालणार नाही. इथल्या पर्यावरणाची हानी करून आम्हाला प्रकल्प नको. या प्रकल्पासाठी जनमत चाचणी घेण्यापेक्षा लोकांसमोर जा. उपऱ्यांची सुपारी घेऊन स्थानिकांच्या घरांवर वरवंटा फिरवताना लाज वाटत नाही का, अशी घणाघाती टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.