काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत का गेलो? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; उद्धव ठाकरेंना सुनावलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 20:08 IST2022-05-01T20:07:14+5:302022-05-01T20:08:48+5:30
फडणवीसांचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल; मुख्यमंत्री ठाकरे निशाण्यावर

काश्मीरमध्ये मुफ्तींसोबत का गेलो? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; उद्धव ठाकरेंना सुनावलं
मुंबई: आपण म्हणजेच महाराष्ट्र असं काहींना वाटतं. त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राचा सन्मान आणि त्यांच्या अपमान म्हणजे राज्याचा अपमान, असं त्यांना वाटतं. मात्र तसं नाही. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मराठी नाही, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
आम्ही जम्मू-काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींसोबत का गेलो, असा प्रश्न आम्हाला विचारला जातो. आम्ही मुफ्तींसोबत गेलो, कारण त्यावेळची ती गरज होती. तुम्ही जम्मू-काश्मीरात निवडणूक घेऊ शकत नाही, अशी भूमिका पाकिस्ताननं घेतली होती. मात्र आम्ही तिथे निवडणूक घेतली. पण कोणालाच बहुमत मिळालं नाही. राज्यात सरकार येणं गरजंचे होतं. त्यामुळे मुफ्तींसोबत जाण्याचा, सरकार स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला, असं फडणवीस यांनी सांगितलं.
जम्मू काश्मीरमध्ये आम्ही सत्ता स्थापन केली. पण जेव्हा आमचं काम पूर्ण झालं, त्यावेळी सत्ता सोडली. मेहबूबा मुफ्तींना खाली खेचलं, याची आठवण फडणवीसांनी करून दिली. कारसेवकांनी बाबरी मशिदीचा ढाचा पाडला. आमच्या नेत्यांविरोधात खटले चालले. मात्र तुमचा एकही नेता त्यावेळी तुरुंगात नव्हता. आता तर तुम्ही रामाच्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसला आहात, अशी टीका फडणवीसांनी ठाकरेंवर केली.