मुंबई - राज्यात एकीकडे मराठवाडा भागात पुरामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तर दुसरीकडे भाजपा आणि उद्धवसेनेतील आरोप प्रत्यारोप दिवसेंदिवस रंगत चालले आहेत. त्यातच भाजपाने आता ठाकरेंच्या दसरा मेळाव्याबाबत गंभीर दावा केला आहे. या दसरा मेळाव्याचा खर्च ६३ कोटींपर्यंत गेला आहे. ९ आकडा लाभदायक असल्याने उद्धव ठाकरेंचे सर्व व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात असा टोला भाजपाने लगावला आहे.
प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज नऊ हवी. टक्केवारी नऊपेक्षा कमी नसावी, इतकेच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या ३६ च्या आकड्याची बेरीजही नऊ असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचे नियोजनही ६३ कोटींच्या घरात असणार आहे. गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती आहे. मेळाव्यासाठी तब्बल ६३ कोटीचे नियोजन झाल्याचे या गटातील नेत्यानेच हर्षोल्हासित होत सांगितले असा दावा उपाध्ये यांनी केला.
तसेच सभा ठिकाण, स्टेज सजावट, जाहिराती, सोशल मिडीया, त्याशिवाय लोकांना आणायला गाड्या, गाडीत बसून लोकांनी मेळाव्याला यावे म्हणून, शिवाय त्यांच्या वडापाव, चहापाण्याची व्यवस्था असं सगळं मिळून हे ६३ कोटी लागणार आहेत म्हणे. या ६३ कोटी मध्ये अतिवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती? किती घरे वसवली गेली असती? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना लोक स्वतःहून उत्साहात यायचे. तेव्हा सेना प्रमुखाचं विचारांचं सोनं असायचं. आता तशी परिस्थिती नाही! मागचे काही मेळावे आठवा… मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं ही रडगाणी ऐकायला एकट्या गटातून गर्दी पण गोळा होत नाही म्हणून ३६ चा आकडा मोडून ६३ ची गोळाबेरीज करण्याचा हा आटापीटा असल्याचं केशव उपाध्ये यांनी सांगितले.
दरम्यान, नाकी नऊ आले म्हणतात ते हेच! रडगाण्याचे तेच बेसूर सूर आळवायला खरंच ६३ कोटीचा मेळावा घ्यायची गरज आहे का? हवं तर उद्धव ठाकरेंच्या नावाने मराठवाड्यात मदत करा पण हे ६३ कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा असंही भाजपा प्रवक्ते उपाध्ये यांनी म्हटलं आहे. राज्यातील ग्रामीण भागात पावसामुळे पूर स्थिती ओढावली आहे. याठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकासह जमिनीतील मातीही वाहून गेली आहे. त्यातच भाजपा आणि उद्धवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
Web Summary : BJP accuses Uddhav Thackeray's Dussehra rally of costing ₹63 crore, linking it to numerology. They question the expenditure amid Marathwada flood crisis, suggesting aid instead of rallies.
Web Summary : भाजपा ने उद्धव ठाकरे की दशहरा रैली पर ₹63 करोड़ खर्च करने का आरोप लगाया, जिसे अंक ज्योतिष से जोड़ा गया है। मराठवाड़ा बाढ़ संकट के बीच खर्च पर सवाल उठाते हुए, रैलियों के बजाय सहायता का सुझाव दिया।