...म्हणून 'त्या' रात्री मी डीसीपी ऑफिसला गेलो; फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 11:53 AM2021-04-27T11:53:23+5:302021-04-27T11:55:18+5:30

माजी आयपीएस अधिकारी ज्युलियो रिबेरोंच्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

bjp devendra fadnavis explains what happened in the police station after police take remdesivir company owner to the police station | ...म्हणून 'त्या' रात्री मी डीसीपी ऑफिसला गेलो; फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला

...म्हणून 'त्या' रात्री मी डीसीपी ऑफिसला गेलो; फडणवीसांनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला

googlenewsNext

मुंबई: राज्य कोरोना संकटात असताना रेमडेसिविर इंजेक्शन, ऑक्सिजन पुरवठा यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाकयुद्ध सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रेमडेसिविरचं उत्पादन करणाऱ्या एका कंपनीच्या मालकाला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावरून माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी फडणवीसांचा कानउघाडणी केली. फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ असल्यामुळे चुकीची पावलं टाकत असल्याची खरमरीत टीका रिबेरो यांनी केली. या टीकेवर आता फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

रिबेरोजी, तुमचा स्पष्टवक्तेपणा आणि आपल्या प्रोफेशनबाबत असलेली वचनबद्धता याचा मला नेहमीच आदर आहे. तुमचा प्रतिवाद मला करायचा नाही. कारण आपल्यात काही तात्विक मतं-मतांतरे असू शकतात, असं देवेंद्र फडणवीस यांनी 'इंडियन एक्स्प्रेस'मधील लेखात म्हटलं आहे. रेमडेसिविर कंपनीच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आपण पोलीस ठाण्यात का गेलो, त्या रात्री नेमकं काय घडलं, याची सविस्तर माहिती फडणवीसांनी दिली आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदासाठी उतावीळ, म्हणून चुकीची पावलं टाकतायत: माजी IPS अधिकारी

देवेंद्र फडणवीस यांच्या आज प्रकाशित झालेल्या लेखातील प्रमुख मुद्दे असे :
- माझ्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीबद्दल आपण कौतूक केले, त्याबद्दल आभार, तुमचे हे शब्द मला भविष्यात प्रेरणा देत राहतील.

- तुमचा स्पष्टवक्तेपणा आणि आपल्या प्रोफेशनबाबत असलेली वचनबद्धता याचा मला नेहमीच आदर

- तुमचा प्रतिवाद मला करायचा नाही. कारण आपल्यात काही तात्विक मतं-मतांतरे असू शकतात. पण प्रत्येक टीका ही मी रचनात्मक पद्धतीने घेतो. पण, महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्ह फॅक्टरीने जो चुकीचा प्रचार केला, त्याबाबत वस्तुस्थिती सर्वांसमोर ठेवणे, केवळ या हेतूने मी हा लेख लिहित आहे.

- मी किंवा प्रवीण दरेकर यापैकी कुणीही रेमडेसिवीर भाजपासाठी खरेदी करणार नव्हतो. यासंदर्भात एफडीए मंत्र्यांना आधीच दिलेले पत्र हे स्वयंस्पष्ट आहे की, आम्ही केवळ समन्वय घडवून आणत आहोत आणि एफडीएनेच ते खरेदी करायचे आहेत. यात काही अडचणी प्रशासकीय पातळीवर येणार असतील, तर ते आम्ही खरेदी करतो आणि सरकारला देतो, असाही प्रस्ताव दिला. प्रवीण दरेकर यांनी त्या उत्पादक कंपनीसोबत एफडीए मंत्र्यांसोबत संवादही घडवून आणला. यानंतरच एफडीएने अधिकृत पत्र या कंपनीला दिले. त्यामुळे हा साठा महाराष्ट्र सरकारलाच मिळणार होता, हे स्पष्ट होते. शिवाय, स्वत: एफडीए मंत्र्यांनी एका मुलाखतीत हा साठा राज्य सरकारसाठी होता, हे स्पष्ट केलेले आहे.

- मी डीसीपी कार्यालयात का गेलो?
एका मंत्र्याच्या ओएसडीने या पुरवठादाराला फोन केला की, विरोधी पक्षाच्या सांगण्यावरून तुम्ही रेमडेसिवीर का देता? तुम्ही केवळ सरकारच्या सांगण्यावरून दिले पाहिजे.
त्यावर पुरवठादाराने सांगितले की, मी हा साठा केवळ सरकारलाच देणार आहे.
त्याचदिवशी सायंकाळी एक एपीआय सिव्हील ड्रेसमध्ये त्याला ट्रॅप करण्यासाठी पोहोचले आणि त्यांनी रेमडेसिवीर मागितले. पण, सदर कंपनीने त्याला ते देण्यास ठाम नकार दिला. हा ट्रॅप फसल्यानंतर रात्री 8 ते 10 पोलिस त्यांच्या घरी गेले आणि त्यांचा फोन तपासला आणि त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन गेले. दरेकर यांनी मला माहिती दिली की काहीतरी गौडबंगाल आहे.

- मी जॉईंट सीपी यांच्याशी 2-3 वेळा बोललो. त्यांना संपूर्ण प्रकरण, एफडीएची परवानगी आणि धमक्यांचे कॉल याची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर मी मुंबई पोलिस आयुक्तांना लँडलाईन, मोबाईल आणि एसएमएस अशा तिन्ही पद्धतीने संपर्क केला. पण, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. माजी गृहमंत्री म्हणून मला अनेक पोलिस अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर अंदाज आला होता की, ही कारवाई राजकीय हेतूने होते आहे. महाराष्ट्राला ज्या औषधाची गरज आहे, ते मिळत असेल तर त्या व्यक्तीचा असा छळ होऊ नये, यासाठी धावपळ करणे, ही माझी नैतिक जबाबदारी होती.

- जाहीर न करता मी तेथे गेलो असे नाही. हा संपूर्ण प्रकार मी सीपींना एसएमएसने कळविला. तुमच्याकडून प्रतिसाद नाही, म्हणून मी डीसीपी कार्यालयात जातोय, हेही कळविले. जॉईंट सीपी, अ‍ॅडिशनल सीपी, डीसीपी यांनाही कळविले. डीसीपी कार्यालयात पोहोचल्यावर त्यांनी मान्य केले की, एफडीएच्या आदेशाची प्रत आम्हाला माहिती नव्हती. तेथे गेल्यावर मी हा सुद्धा प्रश्न विचारला की, या कंपनीने साठेबाजी केली आहे का?, केली असेल तर तत्काळ कारवाई करा. पण, त्यांनी सांगितले की काही कंपन्यांची माहिती आहे.

- 10 मिनिटात जॉईंट सीपी आणि अ‍ॅडिशनल सीपी तेथे पोहोचले. आमच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सीपींशी खाजगीत चर्चा केली आणि नंतर त्या कंपनीच्या व्यक्तीला आवश्यकता पडल्यास पुन्हा बोलावू असे सांगून सोडून दिले.

- माजी मुख्यमंत्र्यांनी पोलिस ठाण्यात जावे की नाही, यासंदर्भात मला सांगायचे आहे की, मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला. सरकार ज्याला कॉल करीत नाही आणि आमच्या एका कॉलवर जो राज्याला मदत करतो आहे, त्याचा छळ होऊ नये, हा एकमेव हेतू होता. गृहमंत्री म्हणून मी कायम प्रोफेशनल इंटिग्रिटी पाळली आहे. आणि म्हणून माझ्या हातून कधी चूक झालीच तर एखाद्या पोलिस कॉन्स्टेबलची माफी मागण्यास सुद्धा मी मागेपुढे पाहणार नाही. कारण, मी नेहमीच माझ्या कामाशी प्रामाणिक राहिलो आहे. तरीसुद्धा तुमच्या मतांचा मला आदर आहे आणि तसा बदल घडवून आणण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन.

- विरोधी पक्ष हा काही केवळ बोट दाखविण्यासाठी नसतो. पण अशा स्थितीत तो आपले संपर्क वापरून राज्याला मदत करणारा सुद्धा असला पाहिजे, हा विचार करूनच आम्ही हा मदतीचा प्रयत्न केला. या कंपनीला परवानगी मिळण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली आणि अधिकाधिक रेमडेसिवीर महाराष्ट्रालाच मिळाव्यात, अशी अट घातली. पण, यात इतके भयंकर राजकारण होईल, याची कल्पना सुद्धा आम्ही केली नव्हती. महाविकास आघाडीच्या फेक नरेटिव्ह गँगने जेव्हा त्याचे खोटे व्हीडिओ तयार केले, तेव्हा गलिच्छ राजकारणाने आणखी हीन पातळी गाठली होती. अर्थात हे विषय स्वतंत्रपणे कायदेशीरदृष्ट्या आपण हाताळणार आहोतच.
 

Web Title: bjp devendra fadnavis explains what happened in the police station after police take remdesivir company owner to the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.