BJP Chitra Wagh Criticized Aaditya Thackeray: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातून ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हाप्रमुख, माजी नगरसेवक यांच्यासह अनेक जण शिवसेना शिंदे गटात सामील होत आहेत. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नाही. एकीकडे स्वबळावर महापालिका निवडणुका लढण्याची तयारी उद्धव ठाकरे यांनी केली असली, तर दुसरीकडे मात्र ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत चालल्याचे दिसत आहे. असेच सुरू राहिल्यास आगामी महापालिका निवडणुका या ठाकरे गटासाठी मोठे आव्हान ठरू शकते, असे सांगितले जात आहे. राजन साळवी यांच्यानंतर अनेक कोकणातील नेते, पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात या घडामोडी सुरू असताना आदित्य ठाकरे दिल्लीत गेले. यावरून भाजपाने टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन खासदार संजय राऊत आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. यानंतर आदित्य ठाकरे यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, एकनाथ शिंदेंनी आमच्यासोबतच नव्हे तर महाराष्ट्राशी गद्दारी केली. अनेक लोक पक्ष सोडतात, पक्षातून बाहेर जातात पण यांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडण्याचे पाप, दिलेले नाव चोरण्याचे पाप, चिन्ह चोरण्याचे पाप केले, त्याचा आम्हाला राग आहे. महाराष्ट्रात जी सुख, शांती, समृद्धी आम्ही आणण्याचा प्रयत्न करत होतो तेदेखील दुसऱ्या राज्यात पाठवण्याचे पाप शिंदेंनी केले आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच लाडकी बहीण योजना, पालकमंत्रीपदाचा वाद यांवरूनही आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला. आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी एक्सवर पोस्ट करत उत्तर दिले.
कुणासमोर न झुकणारे आदित्य ठाकरे दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत
चित्रा वाघ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ज्यांच्या आजोबांना नेते 'मातोश्री'वर भेटायला यायचे, त्यांचा नातू मात्र दिल्लीत जाऊन चरणस्पर्श करतोय..! मराठी अस्मितेचा हा अपमान नाही का..? संजय राऊत रोज पत्रकार परिषद घेऊन मोठमोठ्या गर्जना करतात, पण आदित्य ठाकरेंच्या दिल्लीतल्या हुजरेगिरीवर गप्प का? की यावरही काहीतरी चमत्कारिक स्पष्टीकरण येणार का..! आम्ही दिल्लीत कुणापुढे झुकत नाही म्हणणारे आदित्य ठाकरे थेट दिल्लीत जाऊन राहुल गांधींची हुजरेगिरी करत आहेत! महाराष्ट्रात स्वाभिमानाच्या गप्पा आणि दिल्लीत चरणस्पर्श–हीच का ठाकरे गटाची नवी परंपरा..? आजोबांचे तरी स्मरण ठेवा रे!, या शब्दांत
दरम्यान, मागील ३ महिन्यापासून महाराष्ट्रात महायुती सरकारमध्ये अनेक मुद्द्यांवर वाद आहे. मुख्यमंत्री कोण होणार त्यासाठी १०-१५ दिवस वाद चालला. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, ते झाल्यानंतर पालकमंत्री कोण यावरून अजूनही वाद सुरू आहेत. स्वार्थीपणा आणि हावरटपणा थांबत नाही. जनतेच्या प्रश्नावर कुणी बोलत नाही. लाडकी बहीण योजनेत २१०० रूपये देणार ते सुरू केले का, लाडका भाऊ योजनेत १० हजार देणार ते सुरू केले का? अनेक गोष्टी महाराष्ट्र करणार असे सांगितले पण अजून सुरू नाही असा आरोपही आदित्य ठाकरेंनी केला.