BJP Chandrashekhar Bawankule News: संजय राऊत यांचे बोलणे आता मला काहीच ऐकू येत नाही आणि महाराष्ट्र त्यांना ऐकायला तयार नाही. उद्धव ठाकरे यांनी भगव्याचा विचार सोडला आहे. म्हणून मी म्हटले की, उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले आहेत, आता ते अध्यक्षही होतील. बाळासाहेब यांनी सांगितले होते की, ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जावे लागेल, त्यादिवशी मला दुकान बंद करावे लागेल. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्व पायदळी तुडवले, अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना बावनकुळे यांनी अनेक विषयांवर प्रतिक्रिया दिली. शरद पवार गटाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत बोलताना, एका पराभवाने खचणार नाही, देशातील राजकीय परिस्थिती पाहता वैचारिक लढा देण्याची गरज आहे, असे विधान शरद पवारांनी केल्याच्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला २०४७ पर्यंत विरोधी पक्ष म्हणूनच काम करण्याच्या शुभेच्छा दिल्या.
२०४७ पर्यंत आता शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला काही वाव नाही.
विकसित भारताचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विकसित भारताला साथ देण्याकरिता संपूर्ण देश पंतप्रधान मोदी यांच्यासोबत उभा आहे. विकसित महाराष्ट्राचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्रातील १४ कोटींची जनता देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभी आहे. महायुतीच्या सोबत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीने आता २०४७ पर्यंत वाट पाहावी. २०४७ पर्यंत त्यांनी आपापल्या पक्षात चांगले काम करावे. मी त्यांना विरोधी पक्षात काम करण्याच्या शुभेच्छा देतो, असा खोचक टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.
दरम्यान, दिशा सालीयन प्रकरणी जोपर्यंत पोलीस अंतिम आकलनावर येत नाहीत, तोपर्यंत मी त्यावर बोलन योग्य नाही. तसेच नितेश राणे हे हिंदू विरोधात काम करणाऱ्यांबद्दल बोलतात. पाकिस्तान जिंकली तर फटाके फुटतात. हे लोक फायदा या देशाचा घेतात पण गुण पाकिस्तानचे गातात. देशविरोधी षडयंत्र रचले जाते त्यावर नितेश राणे बोलत आहेत. समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही यावर सगळ्यांनी भर दिला पाहिजे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.