Maharashtra Politics: “उद्धवजी पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्करप्रमुख बनता बनता राहिले”; भाजपचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2022 17:31 IST2022-09-11T17:30:48+5:302022-09-11T17:31:40+5:30
Maharashtra Politics: फेसबुक लाइव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता, असा पलटवार भाजपने केला आहे.

Maharashtra Politics: “उद्धवजी पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्करप्रमुख बनता बनता राहिले”; भाजपचा टोला
Maharashtra Politics: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हळूहळू सर्वच पक्ष सक्रीय होताना दिसत आहेत. यातच शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष अधिकाधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिवसेनेतील नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपही वाढत आहेत. यातच युवासेना नेते वरुण सरदेसाई यांनी एक दावा केला असून, याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील, याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली, असा दावा वरुण सरदेसाईंनी केला.
उद्धव ठाकरे राज्यात ५ वर्षे मुख्यमंत्री पदावर राहिले तर, २०२४ साली ते पंतप्रधान पदाचे प्रबळ दावेदार होतील, ही भीती असल्यानेच भाजपने सरकार पाडले, असा आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे. तसेच, भाजपविरोधी प्रत्येक राज्यात जे पक्ष आहेत, ते पक्ष उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यामागे उभे राहतील हे भाजपला कळून आले होते. म्हणूनच, कुणाला खोके दिले, कोणाला धमकी दिली, अजून काही दिलं आणि आपल्याला पायउतार व्हावे लागले, असा गंभीर आरोप वरुण सरदेसाई यांनी केला आहे. याला भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता
अतुल भातखळकर यांनी एक ट्विट केले असून, वरुण सरदेसाई यांनी केलेल्या दाव्यावर पलटवार केला आहे. 'उद्धव ठाकरे पंतप्रधान होतील याच भीतीने भाजपने शिवसेना फोडली', वरुण सरदेसाईंचा दावा.Hmmmm खरंय, उद्धवजी पंतप्रधान आणि सरदेसाई भारताचे लष्करप्रमुख बनता बनता राहिले... फेसबुक लाईव्हवाला घरबशा पंतप्रधान लोकांच्या नशिबात नव्हता, असे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे. तसेच दुसऱ्या एका ट्विटमध्ये राज्यातील सत्ता गमावली काही दिवसांनंतर महापालिकाही जाणार. टक्केवारी बंद होणार. म्हणून जनाबसेनेच्या पक्षप्रमुखानी कबरींचे सुशोभीकरण करण्याचा व्यवसाय सुरू केलाय असे कळते, अशी टीकाही अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर केली आहे.
दरम्यान, युवासेना एकच आहे. या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आहेत. बाकी कुणाला काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक गल्लीबोळात अनेक मंडळे असतात. त्यामुळे असे मंडळ स्वत:ला कुणाला स्थापन करावसे वाटत असेल तर त्यांचा विषय आहे असं सांगत युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची खिल्ली उडवली.