BJP Ashish Shelar News: गणेशोत्सव, दहीहंडी, नागपंचमी अशा हिंदू सणांच्या विरोधात षड्यंत्र रचले जाते. हा शहरी नक्षलवाद्यांचा डाव आहे. आपण तो हाणून पाडू आणि यावेळी राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करू, असे आवाहन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी केले. गणपतीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पेण येथील हमरापूर, जोहे, कळवे या गावातील मूर्तीकारांच्या विविध संघटनातर्फे आशिष शेलार यांचा तांबडशेत येथे जाहीर सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
पीओपी मूर्तीवरील बंदीबाबत, ठरवून षड्यंत्र केले गेले. तत्कालीन काँग्रेस आणि आताची महाविकास आघाडी हे सगळेच त्यात सामील होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आम्ही मूर्तिकार बांधवांच्या सोबतीने एकजुटीने लढलो आणि जिंकलो. हा विजय आपल्या पारंपारिक सणांच्या जपणुकीसाठी खूप महत्त्वाचा होता, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
गणेशोत्सवाचा सण हा बंद करण्याचा घाट
गेली काही वर्षे हिंदुत्वाचा प्रतीक असलेला सार्वजनिक गणेशोत्सवाचा सण बंद करण्याचा जणू घाटच घातला आहे. या षड्यंत्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि ठाकरे सेना सहभागी असून, हा शहरी नक्षलवाद्यांचा अजेंडा आहे. याची सुरूवात २००३ मध्ये झाली, जेव्हा नैसर्गिक जलस्त्रोतावर होणारे हिंदूंचे अत्यंविधी आणि अन्य संस्कार विधी बंद करावे, अशी मागणी करीत एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली. या याचिकेवर प्रतिज्ञापत्र सादर करताना तत्कालीन आघाडी सरकारने पीओपीच्या गणेशमूर्तीचा विषय यामध्ये घूसवला. त्याचवेळी तत्कालीन सरकाने या याचिकेला विरोध केला असता तर एवढा मोठा लढा देण्याची वेळ आली नसती, असे सांगत भाजपाने न्यायालयासह विविध पातळीवर दिलेल्या लढ्याचीण माहिती आशिष शेलार यांनी दिली. तसेच या वर्षीपासून गणेशोत्सव अधिक उत्साहात साजरा करू या, असे सांगत आपला गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्यमहोत्सव घोषित केला असून, त्याची रुपरेषा त्यांनी जाहीर केली.
दरम्यान, यावेळी रायगड जिल्हाध्यक्ष, राज्यसभा खासदार धैर्यशील पाटील, आमदार रवी पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, महाराष्ट्र गणेश मूर्तिकार संघटना अध्यक्ष अभय म्हात्रे, जयेश पाटील गणेश मूर्तिकार संघटना विभाग अध्यक्ष, नायब तहसीलदार दादू कारेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य नीलिमा पाटील, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील आणि मुर्तिकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.