जैवविविधता जपण्यासाठी देशी झाडांची लागवड गरजेची
By Admin | Updated: March 6, 2017 01:22 IST2017-03-06T01:22:54+5:302017-03-06T01:22:54+5:30
भौगोलिक क्षेत्रापैकी किमान ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असावे, असे सांगितले जाते.

जैवविविधता जपण्यासाठी देशी झाडांची लागवड गरजेची
बारामती : भौगोलिक क्षेत्रापैकी किमान ३३ टक्के क्षेत्र वनाखाली असावे, असे सांगितले जाते. मात्र, महाराष्ट्रात कागदोपत्री २०.४ टक्केच क्षेत्र वनक्षेत्राखाली असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर अलीकडच्या काळात देशी वनसंपदा जतन करणे, देशी झाडांची लागवड जास्तीत जास्त करणे आवश्यक असताना, ज्या परदेशी झाडांची आवश्यकता नसताना मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते त्यामुळे जैवविविधता नष्ट होत आहे. त्यामुळे वाढते तापमान, वातावरणातील बदल दूर करण्यासाठी दीर्घकालीन विकासासाठी स्थानिक देशी वृक्षारोपणाची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी चित्रपट अभिनेते तथा पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना (वन) आवाहन केले आहे.
आई जन्म देते आणि झाड माणसाला श्वास देत जगवत असते. ज्या झाडाचे पान, फूल, फळ, मूळ आपण खाऊ शकतो, अशीच झाडे लावली पाहिजे. त्याचबरोबर जैवविविधता वाढेल, याचीदेखील काळजी घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पर्यावरणतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड, सुहास वायगणकर, प्रा. लक्ष्मी शिंदे, डॉ. पाटील, प्रसाद मगदूम या पर्यावरण संशोधकांनी याबाबत संपूर्ण राज्यात दौरा केला. शाळा, महाविद्यालयस्तरावर जनजागृती केली. शास्त्रीयदृष्ट्या देशी झाडेच पर्यावरण रक्षण करू शकतात. त्यामुळे केवळ परदेशी शोभिवंत झाडे लावण्यापेक्षा देशी झाडांनाच महत्त्व द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
परदेशी झाडांचा धोकाच अधिक....
सध्या निलगिरी, आॅस्ट्रेलियन बाभुळ, गिरीपुष्प, अशोक, गुलमोहर, निलमोहर, पिचकारी, रेन ट्री, सिल्व्हर ओक, सुरू, अशी झाडे लावण्यावर भर दिला जात आहे. ही झाडे पर्यावरणाला हानीकारक आहेत. जैवविविधेतेच्या दृष्टीने उपयोगी नाहीत. ही झाडे भूगर्भातील पाणी अधिक खेचतात. या झाडांची पाने लवकर कुजत नाहीत. परिणामी तेथे कीटक, सूक्ष्म जीवजंतू येत नाहीत. जैविक विघटन होत नाही. वादळात, मोठ्या पावसात ही झाडे मोठ्या प्रमाणात उन्मळून पडतात. त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे पर्यावरण रक्षण होत नाही. त्यामुळे देशी झाडांनाच राज्यात सर्व ठिकाणी प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर शाळा, महाविद्यालयांसह सामाजिक वनविभाग, सामाजिक वनीकरण आदींना याबाबत सुचित करावे, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
>देशी झाडांमुळे जैवविविधता...
परदेशी झाडे सर्वांनाच हानीकारक आहेत. चुकीच्या झाडांचे रोपण केल्यामुळे माळढोक पक्षी सोलापूरमधून दुर्मिळ होत आहे. पश्चिम घाटात निलगिरीच्या दाट भागातून भातखचरा नुकसान होत आहे. माण तालुक्यात सह्याद्री देवराई या प्रकल्पांतर्गत ५० पेक्षा स्थानिक प्रजाती झाडांना महत्त्व दिले. त्यामुळे ६ हजार झाडे लावण्यात आली. त्यातून पर्यावरण रक्षणाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. वड, आंबा, पिंपळ, चिंच, रामफळ, सीताफळ, नांद्रुक, बाभूळ, बोर, उंबर, जांभूळ, शेवगा, बिबा, रूद्राक्ष, कवट, वेल, कडीपत्ता,
लिंबू, अंजीर, खैर, विलायती चिंच, अर्जुनी, अंजन, कांचन, मेडशिंगी, महारूग, पारिजातक, कळक, तुती, रक्तचंदन, देवबाभुळ, बोकर, सिंधी, रिटा, हेरडा, भेगडा, आपटा, सीतेचा अशोक, गुळभेंडी, सोनचाफा, बहावा, मोहगनी अशा देशी झाडांची वातावरणानुसार लागवड उपयुक्त ठरणार आहे.
>जनजागृती...
येथील निसर्ग जागर प्रतिष्ठानचे प्रमुख
डॉ. महेश गायकवाड यांनी पुणे शहर, जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांसह राज्यात याबाबत जनजागृती केली आहे. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना झाडे लावताना स्थानिक झाडांचा विचार करावा. पर्यावरणपूरक झाडांमुळे वन्यजीवांनादेखील फायदा होतो, अशी जनजागृती गेल्या काही वर्षांपासून सुरू केली आहे.