लक्ष्य मोठे तर यशही मोठे !
By Admin | Updated: July 30, 2014 01:20 IST2014-07-30T01:20:58+5:302014-07-30T01:20:58+5:30
विद्यार्थ्यांनी नेहमीच मोठे लक्ष्य ठेवले पाहिजे पण विद्यार्थी स्वत:च्या क्षमतेपलीकडले लक्ष्य ठेवत नाही. आपल्या क्षमतांच्या पलीकडचा विचार करा आणि ते पूर्ण करण्यासाठी आव्हानाला सामोरे जा.

लक्ष्य मोठे तर यशही मोठे !
कलामचाचांनी घेतला विद्यार्थ्यांचा क्लास : विज्ञान भारतीचे आयोजन
नागपूर : विद्यार्थ्यांनी नेहमीच मोठे लक्ष्य ठेवले पाहिजे पण विद्यार्थी स्वत:च्या क्षमतेपलीकडले लक्ष्य ठेवत नाही. आपल्या क्षमतांच्या पलीकडचा विचार करा आणि ते पूर्ण करण्यासाठी आव्हानाला सामोरे जा. लहान लक्ष्य ठेवणे हा गुन्हा आहे. कुठल्याही क्षेत्रात काम करा पण तेथे तुम्ही अव्वलच असले पाहिजे, याचा प्रयत्न करा, असा मूलमंत्र देत कलाम चाचांनी आज विद्यार्थ्यांशी संवाद साधला. लक्ष्य मोठे असले तर यशही मोठे असेल, असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विज्ञान भारतीच्यावतीने रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात माजी राष्ट्रपती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वैज्ञानिक ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याशी विद्यार्थ्यांचा संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारताच्या प्रगतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग विषयावर डॉ. कलाम यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले.
केवळ विज्ञानच नव्हे पण कुठल्याही क्षेत्रात सातत्याने ज्ञानग्रहण करीत राहिले पाहिजे. डॉ. कलाम म्हणाले, मी ‘व्हिजन २० टष्ट्वेण्टी’ हे अभियान राबविले होते. त्यात ग्रामीण आणि शहरी भागातली दरी कमी करण्याचा प्रयत्न केला. ही दरी मोठी आहे. ती कमी करण्याचा प्रयत्न विज्ञानाच्या माध्यमातून झाला पाहिजे.
कृषी क्षेत्राचा विकास, शिक्षण, आरोग्य सेवा आणि मूल्याधारित शिक्षणाशिवाय या देशाची प्रगती गतीने होणार नाही. त्यासाठी आता विद्यार्थ्यांनीच समोर आले पाहिजे. आपले प्रत्येक पाऊल देशाच्या एकसंघतेसाठीच असले पाहिजे. दहशतवादाचा समूळ नायनाट करून गरिबी संपवायची असेल तर विद्यार्थ्यांना ग्रामीण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रचार करावा लागेल.
आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या भागातील लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी झाला पाहिजे. तुमचे शिक्षण आणि ज्ञान देशाच्या विकासाला पूरक नसेल तर त्या ज्ञानाचा अर्थ उरत नाही, मी मानतो. याशिवाय इतरांची यशही आनंदाने स्वीकारून त्यांच्या यशात सहभागी होता आले पाहिजे. देशात रिसर्च कल्चरचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी निधीची तरतूद लागते पण रिसर्च मोठ्या प्रमाणावर झाला तर उद्योगांकडून निधी मिळू शकतो. याप्रसंगी त्यांनी विज्ञान भारतीची प्रशंसा केली.
७९ साली सहायक प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून इस्त्रोमध्ये काम करीत होतो. त्यावेळी एसएलव्हीचे प्रक्षेपण अयशस्वी झाले तेव्हा इस्त्रोच्या प्रमुखांनी या अपयशाची जबाबदारी स्वत: घेतली होती. पण दुसऱ्यांदा हे प्रक्षेपण यशस्वी झाले तेव्हा त्यांनी माध्यमांसमोर मला उभे केले. यामागे हे यश संपूर्ण चमूचे आहे, हे त्यांनी दाखवून दिले. हे ‘टिम स्पिरीट’ प्रत्येक क्षेत्रात असावे, असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी विज्ञान भारतीची प्रशंसा केली.
आपला देश विज्ञान आणि तंत्रज्ञानात प्रगती करीत आहे. यात नव्याने येणाऱ्या तुमच्यासारख्या संशोधकांचीही भर पडते आहे. तुमच्या संशोधनावर भारत जगात क्रमांक एकचा देश असेल, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. कारण तुम्ही ते सहज करू शकता. पाणी आणि जमिनीवर चालणारी विमाने तयार करणारा भारत हा दुसरा देश आहे. ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र भारताने रशियाच्या मदतीने विकसित केले पण आता आपणच हे मिसाईल इतरांना निर्यात करतो आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने आपण यशस्वी होतो आहोत, असे डॉ. कलाम म्हणाले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांकडून देशासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग करणार असल्याची शपथ घेतली. कार्यक्रमाला मानव संसाधन मंत्री स्मृती इराणी आणि विज्ञान भारतीचे पदाधिकारी रवींद्र जोशी, संजय वटे, श्रीराम ज्योतीषी, डॉ. पराग निमिषे, बाळकृष्ण जोशी, सहस्त्रबुद्धे, डॉ. भूषण जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.(प्रतिनिधी)