निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 14:45 IST2025-12-16T14:45:05+5:302025-12-16T14:45:27+5:30
Shiv Sena Shinde Group News: महापालिका निवडणुका जाहीर होताच ठाकरे गटाच्या नगरसेवकांनी पक्षाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
Shiv Sena Shinde Group News: मुंबईसह २९ महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने अखेर जाहीर केला. १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होईल. नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत जशा वेगवेगळ्या आघाड्या झाल्या होत्या, तशाच आता महापालिका निवडणुकांतही होणार का याकडे सगळ्यांचे लक्ष असेल. या निवडणुकांत भाजपा-शिंदेसेनेत युती असेल, याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यानंतर ठाकरे गटातील गळती कायम असल्याचे पाहायला मिळत आहे.
विधानसभा निवडणुका झाल्यापासून ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात नगरसेवक, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते बाहेर पडले. दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे मनसे आणि उद्धव सेनेतील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढल्याचे म्हटले जात आहे. ठाकरे बंधूंनी अद्याप अधिकृत युतीची घोषणा केली नसली, तरी जवळपास युती निश्चित मानली जात आहे. असे असले तरी ठाकरे गटाला लागलेली गळती थांबताना दिसत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्धवसेनेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका उर्मिला गोसावी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक अरुण गीध, माजी नगरसेविका वंदना गीध, बहुजन समाज पार्टीच्या माजी नगरसेविका सोनी अहिरे आणि समाजसेवक कपिल गोड पाटील यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.
दरम्यान, अलीकडेच अकोला जिल्ह्यातील ठाकरे गटाचे शहरप्रमुख राजेश मिश्रा यांच्यासह पाच माजी नगरसेवकांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या पुढाकाराने शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला.