Pooja Khedkar Supreme Court: आयएएस प्रशिक्षण कालावधीतच वादग्रस्त ठरलेल्या पूजा खेडकरला अखेर सर्वोच्च न्यायालयात अटकेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने अटकपूर्वी जामिनाचा अर्ज फेटाळल्यानंतर पूजा खेडकरनेसर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात पूजा खेडकरला काही दिवसांसाठी अटकेपासून संरक्षण मिळालं आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्याचबरोबर अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश शर्मा यांच्या खंठपीठासमोर या प्रकरणावर बुधवारी (१५ जानेवारी) सुनावणी झाली.
पूजा खेडकर प्रकरण: सुनावणीत काय घडलं?
न्यायमूर्ती नागरत्ना यांनी खेडकरच्या वकिलांना विचारले की, अटकेची भीती नाहीये, तर याचिका का दाखल केली. त्यांनी खेडकरला धक्का सुद्धा लावलेला नाहीये. चौकशीसाठीही बोलवलेलं नाहीये. यावर पूजा खेडकरचे वकील सिद्धार्थ लूथरा म्हणाले की, उच्च न्यायालयाने त्यांच्याविरोधात अडचणीत आणणारी टिप्पणी केली आहे.
सुनावणी अंती सर्वोच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारीपर्यंत पूजा खेडकरविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेसंदर्भात दिल्ली पोलीस आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली आहे.
उच्च न्यायालयाने फेटाळली होती याचिका
पूजा खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती फेटाळून लावली होती. ही फक्त एका संवैधानिक संस्थेची नाही, संपूर्ण समाज आणि देशासोबत केलेली फसवणूक आहे. त्याचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, असे न्यायालयाने याचिका फेटाळताना म्हटले होते.