जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदी निवडणूक जाहीर झाली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे एनडीएकडून उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील, अशी घोषणा भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली आहे.
भाजपने रविवारी महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी पक्षाची निवड अंतिम करण्यासाठी बोलावलेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
चंद्रपुरम पोन्नूस्वामी राधाकृष्णन असे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे नाव असून ते मुळचे तामिळनाडूचे आहेत. राधाकृष्णन यांनी त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी त्यांनी १८ फेब्रुवारी २०२३ ते ३० जुलै २०२४ पर्यंत झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. मार्च ते जुलै २०२४ पर्यंत तेलंगणाचे राज्यपाल आणि मार्च ते ऑगस्ट २०२४ पर्यंत पाँडिचेरीचे उपराज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार सांभाळला आहे.