कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
By प्रविण मरगळे | Updated: December 20, 2025 14:06 IST2025-12-20T14:05:29+5:302025-12-20T14:06:59+5:30
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार सुभाष भोईर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.

कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
मुंबई - आगामी महापालिका निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांना कल्याणमध्ये मोठा धक्का बसला आहे. याठिकाणचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. कल्याण डोंबिवली भागात अन्य पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात भाजपात प्रवेश होत आहे. त्यात सुभाष भोईर यांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांना धक्का असला तरी अप्रत्यक्षपणे भाजपा शिंदेसेनेची कोंडी करतंय का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
सुभाष भोईर हे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार आहेत. त्याठिकाणी विद्यमान आमदार राजेश मोरे हे शिंदेसेनेचे आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांनी कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर यांना शिवसेनेचा एबी फॉर्म दिला होता. मात्र ऐन निवडणुकीत खासदार श्रीकांत शिंदे यांनी भोईर यांच्या तोंडचा घास हिसकावून कल्याण ग्रामीणची उमेदवारी ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांना दिली. तेव्हापासून शिंदे आणि भोईर यांच्यात दुरावा आहे. २०२२ मध्ये शिंदे यांनी ठाकरेंची फारकत घेतल्यानंतर सुभाष भोईर ठाकरेंसोबत कायम राहिले होते. त्यानंतर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सुभाष भोईर श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात लढण्यास इच्छुक होते परंतु ठाकरेंनी भोईर यांच्याऐवजी वैशाली दरेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे सुभाष भोईर नाराज होते. अखेर आज महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भोईर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.
शिंदेसेनेची कोंडी?
अलीकडे अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते, तेव्हा भाजपाला कुबड्यांची गरज नाही असं सांगत अप्रत्यक्षपणे घटक पक्षांना इशारा दिला होता. तेव्हापासून भाजपा २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उतरेल अशी चर्चा आहे. त्यात मागील काही काळातील पक्षप्रवेश पाहिले तर शिंदेसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघात भाजपाने विरोधातील प्रमुख चेहरा आपल्या पक्षात घेत निवडणुकीसाठी पर्यायी व्यवस्था उभारण्याचं काम हाती घेतल्याचे दिसते. कल्याण ग्रामीण मतदारसंघात विद्यमान आमदार राजेश मोरे यांनी मनसे उमेदवार राजू पाटील यांचा पराभव केला. त्याठिकाणी भाजपाकडे सुभाष भोईर यांच्या रुपाने ताकद उभी करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. त्यामुळे पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेची कोंडी भाजपा करतंय हेच यातून दिसून येते.
कोण आहे सुभाष भोईर?
सुभाष भोईर हे ठाणे महापालिकेत ५ वेळा नगरसेवक होते. शिक्षण समितीचे अध्यक्ष राहिले आहेत. त्याशिवाय ठाणे महापालिकेत ४ वेळा विरोधी पक्षनेते राहिले आहेत. सिडकोचे संचालक म्हणून काम करत होते. काही काळ ते विधान परिषदेचे आमदार होते. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेकडून ते कल्याण ग्रामीण मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. शिवसेनेचे कल्याण लोकसभेचे संपर्कप्रमुखपद त्यांच्याकडे होते.