ठाकरे गटाला मोठे खिंडार, गळती थांबता थांबेना; १० माजी नगरसेवक साथ सोडणार, शिंदेसेनेत जाणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 19:12 IST2025-02-07T19:10:16+5:302025-02-07T19:12:30+5:30
Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ऑपरेशन टायगर चर्चेत आले आहे. राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत आहेत.

ठाकरे गटाला मोठे खिंडार, गळती थांबता थांबेना; १० माजी नगरसेवक साथ सोडणार, शिंदेसेनेत जाणार
Shiv Sena Thackeray Group Vs Shinde Group: २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारूण पराभव झाला. यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाने मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापण्यासाठी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. परंतु, ठाकरे गटाला एकामागून एक धक्के बसत असून, पक्षातील गळती थांबताना दिसत नाही. अगदी अलीकडेच परभणीमधील जिल्हाप्रमुख विशाल कदम यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केला. यानंतर आता संभाजीनगर येथील १० माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असून, शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा निर्धार त्यांनी केल्याची माहिती देण्यात आली आहे.
अलीकडेच शिंदे गटाच्या नेत्यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन धनुष्यबाण राबवणार असून, ठाकरे गटाचे आमदार, खासदार शिंदेसेनेच्या संपर्कात असून, लवकरच त्याबाबत निर्णय होणार असल्याचा दावा केला. परंतु, गेल्या काही दिवसांतच राज्यातील बहुतांश भागातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत असून, शिंदे गटात प्रवेश करत आहेत. याबाबत ठाकरे गटाचे ६ खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा केला गेला होता. याबाबत हा दावा खोटा असल्याचे सांगत ठाकरे गटाच्या खासदारांनी एकजूट दाखवली. या घडामोडी सुरू असतानाच संभाजीनगर येथील १० माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याचे सांगितले जात आहे.
१० माजी नगरसेवक उद्धव ठाकरेंची साथ सोडणार, शिंदेसेनेत जाणार
एकीकडे सर्वच पक्षांनी आगामी महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. ठाकरे गटानेही मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. परंतु, एकामागून एक ठाकरे गटाला धक्के बसत आहेत. नगरसेवक, पदाधिकारी, नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून चालले आहेत. ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबताना दिसत नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाचा पुरता कस लागणार असल्याचे सांगितले जात आहे. ऑपरेशन टायगरचा पहिला धक्का उद्धव ठाकरेंना संभाजीनगरमध्ये बसला. ठाकरे गटाचे १० माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असून, मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या नगरसेवकांचा प्रवेश होणार असल्याचे समजते.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हात जोडून आणि नतमस्तक होऊन उद्धव ठाकरेंना साथ देण्याची आणि पक्ष सोडून न जाण्याची विनंती केली होती. तर दुसरीकडे, पुण्यातही ठाकरे गटाला धक्के बसत आहेत. उद्धव ठाकरे पुणे दौरा करणार आहेत. ठाकरे गटातील काही पदाधिकारी पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यापूर्वी ठाकरे गटाची एक बैठक पार पडली आणि या बैठकीत उद्धव ठाकरे येणार आहेत तोपर्यंत थांबा, असे नाराज पदाधिकाऱ्यांना सांगितल्याची माहिती आहे.