इशारा खरा करून दाखवला, कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याने केला शिंदेसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 12:18 IST2025-03-19T12:15:36+5:302025-03-19T12:18:10+5:30

Sanjay Kadam News: विधानसभा निवडणुकीत शिवसेना कुणाची याचे उत्तर जनतेने दिले आहे, त्यामुळेच दररोज हजारो कार्यकर्ते मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

big blow to thackeray group in konkan again former mla sanjay kadam join shiv sena shinde group in presence of deputy cm eknath shinde | इशारा खरा करून दाखवला, कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याने केला शिंदेसेनेत प्रवेश

इशारा खरा करून दाखवला, कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याने केला शिंदेसेनेत प्रवेश

Sanjay Kadam News: गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे गटाला लागलेली गळती थांबता थांबत नसल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यभरातून अनेक आजी-माजी नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचंड प्रमाणात ठाकरे गटाला रामराम करत शिवसेना शिंदे गटात सामील होत आहे. अलीकडेच कोकणातही ठाकरे गटाला मोठे धक्के बसले. यानंतरही कोकणात नाराजी नाट्य सुरूच होते. अशातच एका नेत्याने नाराजी बोलून दाखवत पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा इशारा दिला होता. अखेरीस या नेत्याने आपला इशारा खरा करून दाखवत उद्धवसेनेला रामराम केला आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश केला. 

अलीकडेच झालेल्या राजकीय घडामोडींनंतर खेड, दापोली, मंडणगड मतदारसंघात मला अनेक पक्षातून निमंत्रणे येत आहेत. माझ्यासारखे नेतृत्व त्यांच्या पक्षात असावे, यासाठी अनेक नेते प्रयत्न करत आहेत. शिवसेना शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनीही म्हटले आहे की, माझा जुना सहकारी माझ्यासोबत पुन्हा आला, तर पायघड्या घालून त्याचे स्वागत करेन. चांगला कार्यकर्ता, चांगला नेता आपल्यासोबत असावा, या भावनेतून रामदास कदम यांनी केलेल्या विधानाचे स्वागत करतो. माझ्यासोबत पंचायत समिती, जिल्हा परिषद सभापती, सदस्य आहेत. पदाधिकारी आहेत. या सर्वांसोबत बसून निर्णय घेणार आहे. आमच्याच पक्षातील काही लोकांनी पुढाकार घेतला असून, वेगवेगळ्या पद्धतीने माझ्यावर टीका केली जात आहे. मला आता अडचणीत आणण्याचे काम आमच्याच पक्षातील लोकांनी करून तेच कसे शिवसैनिक आहेत, अशा बतावण्या करण्याचे काम सुरू केले. मी पक्ष सोडला की काय फरक पडतो, ते कळेल. काळच त्याचे उत्तर देईल, असे सांगत माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटालाच इशारा दिला होता. तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर संजय कदम यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

इशारा खरा करून दाखवला, कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करून यासंदर्भातील माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह मुंबईतील तीन माजी नगरसेवक आणि छत्रपती संभाजीनगर व सांगली जिल्ह्यातील अनेक लोकप्रतिनिधी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर  प्रवेश केला. या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. दापोली मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम हे बाळासाहेबांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिवसेनेत स्वगृही परतले. कोकणात शिवसेना वाढत आहे. कोकणात एक जागा वगळता सर्वच जागांवर महायुतीचे आमदार जिंकले आहे. शिवसेनेचे दोन कदम कोकणात एकत्र आल्याने आता दापोलीत फक्त शिवसेनेचा दम राहील, असे मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले.

दरम्यान, कोकण हा बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला शिवसेनेचा बालेकिल्ला असून, प्रथम माजी आमदार राजन साळवी व आता संजय कदम यांच्या घरवापसीमुळे पुन्हा हा बालेकिल्ला मजबूत झाला आहे. ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देणाऱ्या बोक्यांना मिळालेली ही चपराक आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना कुणाची याचे उत्तर जनतेने दिले आहे, त्यामुळेच आज दररोज हजारो कार्यकर्ते मूळ शिवसेनेत प्रवेश करत आहे. राज्याचा मुख्यमंत्री असताना दापोली व रत्नागिरी मतदार संघाला प्रत्येकी ३ हजार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता. बाळासाहेबांच्या विचारानुसार आमचा पक्ष सुरु आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. 

 

Web Title: big blow to thackeray group in konkan again former mla sanjay kadam join shiv sena shinde group in presence of deputy cm eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.