वर्ष संपल्यानंतर मिळाल्या सायकली
By Admin | Updated: April 30, 2016 00:41 IST2016-04-30T00:41:24+5:302016-04-30T00:41:24+5:30
पुणे जिल्हा परिषदेने विविध विभागांमार्फत गेल्या वर्षी जिल्हा परिषद शाळांतील सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

वर्ष संपल्यानंतर मिळाल्या सायकली
पुणे : पुणे जिल्हा परिषदेने विविध विभागांमार्फत गेल्या वर्षी जिल्हा परिषद शाळांतील सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सायकली देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मात्र, त्याचे वाटप करण्यास शैक्षणिक वर्षाची अखेर उजाडली. शुक्रवारी प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते या २३ हजार ११६ सायकलींचे वाटप करण्यात आले.
पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकली देण्यात आल्या आहेत. २0१४-१५ या वर्षी पाचवीच्या काही मुलींना सायकली वाटप करण्यात आल्या होत्या. गेल्या वर्षी प्रशासनाने पाचवी ते सातवीच्या सर्वच घटकांतील विद्यार्थ्यांना मात्र १ किलोमीटर अंतराची अट टाकून सायकली देण्याचा निर्णय घेतला.
यात महिला बालकल्याण विभागातर्फे पाचवी ते सातवीतील मुलींना १0 हजार ५५५, शिक्षण विभागातर्फे सर्वसाधारण गटातील मुलांना ५ हजार ७१४ व समाजकल्याण विभागामार्फत मागासवर्गीय मुलांना ६ हजार ८४७ सायकली देण्यात आल्या.
यासाठी तिन्ही विभागांची मिळून एकत्र निविदा काढण्यात आली. यापूर्वी ही प्रकिया आरसीवर होत होती. मात्र, शासनाने ई-निविदा बंधनकारक केल्याने नोव्हेंबर महिन्यात निविदा काढण्यात आली. त्याला प्रतिसाद मिळाला नाही. आलेल्या निविदा तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरल्या. त्यानंतर जानेवारीत निविदा काढण्यात आली. तिला १५ फेबु्रवारीच्या सभेत मंजुरी मिळून मुलांच्या सायकलींचा ठेका कोहिनूर सायकल प्रा. लि. लुधियाना यांना, तर मुलांच्या सायकलींचा ठेका रवी इंडस्ट्रीज यांना मिळाला. ठेका मिळाल्यानंतर २५ मार्चदरम्यान या सायकलींचे पार्ट आले. ते जोडून देण्यात १ महिना गेला. त्यात सायकली कोणत्या विभागाने वाटपाची जबाबदारी घ्यायची याच्यात वाद झाला. गटशिक्षण अधिकाऱ्यांनी सुरुवातीला ही जबाबदारी घेण्यास असमर्थता दर्शवली. (प्रतिनिधी)