माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार माजी मंत्री भास्कर जाधव यांनी नुकतीच नाराजी व्यक्त केली होती. यावरून जाधव हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. जाधव यांच्याच पक्षातील माजी आमदार राजन साळवी हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. यामुळे जाधव देखील महायुतीत जाण्याच्या मार्गावर असल्याची चर्चा सुरु झाली होती. जाधव हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात होते. यावर भाजपाच्या प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य आले आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या कोकणातील गडाला महायुतीने सुरुंग लावला आहे. विधानसभेला जाधवांचा मतदारसंघ वगळता तळकोकणातील एकही मतदारसंघ ठाकरेंना राखता आला नाही. सावंतवाडी, कुडाळ आणि राजापूर, रत्नागिरी असे सर्व मतदारसंघ गमवावे लागले. यामुळे जाधवांच्या नाराजीला महत्व प्राप्त झाले आहे. "महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. यात नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावतं. पण माझं दुर्दैवं मला सतत आडवं आलं आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही," असे जाधव म्हणाले होते.
या नाराजीमुळे जाधव हे कोणाच्या संपर्कात आहेत, असा प्रश्न उपस्थत केला जात आहे. जाधव हे काही काळ राष्ट्रवादीमध्ये देखील होते. पुन्हा ते शिवसेनेत परतले होते. यामुळे ते शिंदे सेनेत जाणार की राष्ट्रवादीत की भाजपात असा अंदाज लावला जात आहे. यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भास्कर जाधव यांच्या राजकीय आयुष्याबद्दल प्रश्नचिन्ह लावू नका, असे म्हटले आहे. तसेच त्यांनी आमच्याशी संपर्क केलेला नाही, असेही स्पष्ट केले आहे.
याचबरोबर बावनकुळे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढणार का या प्रश्नावरही उत्तर दिले आहे. महायुतीत तिन्ही पक्षांनी आपापल्या पक्षाची चाचपणी केली पाहिजे.आमची महायुती अत्यंत मजबूत आहे.आपापला पक्षाला वाढवून इतर स्पेस घेणे आहे. हे आमचे काम आहे. एक कोटी 50 लाख प्राथमिक सदस्य करत आहोत. तीन लाख लोकांना सक्रिय सदस्य करत आहोत. आम्ही महायुती विधानसभा लढली लोकसभेत लढली. पुन्हा स्थानिक स्वराज्य संस्था महायुतीत लढण्याचा विचार आहे, असे बावनकुळे म्हणाले.