तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ द्यावा
By Admin | Updated: February 3, 2015 01:04 IST2015-02-03T01:04:19+5:302015-02-03T01:04:19+5:30
सर्वधर्मसमभावाची शिकवण देत मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य हे विश्वासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची ‘ग्रामगीता’ ही ग्रामीण विकासाचा ज्ञानकोश आहे.

तुकडोजी महाराजांना ‘भारतरत्न’ द्यावा
एस. एन. पठाण : ‘ग्रामगीता’ ग्रामीण विकासाचा ज्ञानकोश
पुणे : सर्वधर्मसमभावाची शिकवण देत मानवतेचा संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य हे विश्वासाठी प्रेरणादायी आहे. त्यांची ‘ग्रामगीता’ ही ग्रामीण विकासाचा ज्ञानकोश आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत अशा महान संताला सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एऩ पठाण यांनी केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दीनिमित्त अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम, जि. अमरावती व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलना’च्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाध्यक्ष पदावरून ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, माजी आमदार उल्हास पवार तसेच सेवा मंडळाचे प्रकाश वाघ, रूपराव वाघ, बबनराव वानखेडे, जनार्दन बोथे, डॉ. रघुनाथ वाडेकर आणि माजी पोलीस अधिकारी विक्रम बोके उपस्थित होते.
भा. ल़ ठाणगे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच सुरेंद्र नावाडे, मुरलीधर जडे, गणेश चौधरी, संजयकुमार दळवी यांना सन्मानित करण्यात आले.
डॉ. पठाण म्हणाले, ‘‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भारतीय अस्मिता सांभाळत सर्वधर्मसमभावाचा संदेश जनमानसात रुजविला. अंधश्रद्धा, बुवाबाजी यांचा प्रखर विरोध करीत तीर्थक्षेत्राकडे न जाता जमीन कसून शेतीची कास धरावी, असे विचार ‘ग्रामगीते’च्या माध्यमातून मांडत सर्वसामान्यांना जगण्याचे बळ दिले. सध्या शिक्षण व्यवस्थेला पांढरपेशी स्वरूप प्राप्त झाले असून, शिक्षणाला कौशल्याची जोड देणारे हे सध्याच्या शिक्षण व्यवस्थेसमोर मोठे आव्हान आहे. यासाठी शिक्षणाचे महत्त्व सांगणारी त्यांची ‘ग्रामगीता’ शिकवली गेली पाहिजे. अयोध्येत मंदिर आणि मशिदीचा वाद मिटलेला नाही. त्यामुळे या वादात पडण्यापेक्षा अयोध्येला ‘मानवता मंदिर’ उभारले जावे, ज्यातून एकात्मकतेचा संदेश दिला जाईल.
नव्या पिढीला जे माहीत नाही, ते देण्याचे काम अशा संमेलनामधून होते, असे सांगून उल्हास पवार म्हणाले, की हे संमेलन म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांची शिदोरी आहे. विज्ञान, तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांचा संयोग झाला नाहीतर इसिस वगैरेसारख्या संघटना डोके वर काढतात. मानवतेचा व्यापक विचार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आपल्या लेखनातून पोहोचविल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
४संमेलनाच्या व्यासपीठावर पुण्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांचा सर्वांत शेवटी सत्कार करण्यात आला. त्याचा वचपा काढीत काही दिवसांपूर्वीच्या विनोद तावडे यांच्याच वक्तव्याची री ओढीत साहित्याच्या व्यासपीठावर भाऊगर्दी करणाऱ्या राजकारण्यांनी प्रेक्षकांमध्ये बसण्यास प्राधान्य द्यावे. ‘नको त्यांना इतके महत्त्व, ज्यांना पाहिजे त्यांना नाही’, अशी मार्मिक टिप्पणी बापट यांनी करीत आपली नाराजी काही अंशी व्यक्त केली. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असणारी ग्रामव्यवस्था देण्यासाठी शासन कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तुकडोजी महाराजांचे कार्य येणार रुपेरी पडद्यावर
पुणे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ‘ग्रामगीते’ला ग्रामीण भागातील ज्ञानकोश म्हणून संबोधिले जाते. आदर्श गाव कसे असावे, याचा वस्तुपाठ घालून देणारी त्यांची ही ‘ग्रामगीता’ आता लवकरच हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड आदी चौदा भाषांमधील वाचकांसाठी उपलब्ध होणार आहे. सर्वधर्मसमभावाची शिकवण देत मानवतेचा संदेश देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जीवनकार्यही रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
राळेगणसिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या ग्रामनिर्माण चळवळीचीही ही ग्रामगीता ‘जननी’ आहे. ‘मत हे दुधारी तलवार’ असे म्हणत देशाचे घटक म्हणून जबाबदारीने वागण्याचा मूलमंत्र देणाऱ्या या गीतेमध्ये आजच्या काळाशी सुसंगत सर्व गोष्टींची उत्तरे मिळतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्रामगीतेमधील प्रेरणादायी विचार सर्वदूर पोहोचविण्याचा विडा अखिल भारतीय गुरुदेव सेवामंडळ, अमरावती यांनी उचलला आहे.
या ग्रामगीतेच्या मराठीत एकूण २३ आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. हा ग्रंथ चौदा भाषांमध्ये अनुवादित करण्याचे काम सध्या सुरू असून, वर्षभरात ही ग्रामगीता भाषिक अस्मितेच्या सीमा ओलांडणार आहे. तसेच इंटरनेटवरही ही ग्रामगीता उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा विचार आहे. तसेच परदेशी भाषांमध्ये ही ग्रामगीता कशी आणता येईल या दृष्टीनेही विचारमंथन सुरू असल्याचे सेवा मंडळाचे जिल्हा संघटक प्रवीण नारायणराव दाऊतपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
४राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी १९५३मध्ये ही ‘ग्रामगीता’ लिहून ग्रामविकासाची खऱ्या अर्थाने दिशा दिली. या ग्रंथाचे १९५४ साली जवळपास एक हजार गावांमध्ये एकाच वेळी प्रकाशन झाले. आज साठ वर्षांनंतरही या ग्रामीणगीतेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता अभियानाचा मूलाधारही हाच ग्रंथ मानला जातो.