भंडारा-गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांच्या कारचा आज भीषण अपघात झाला. दिल्लीहून नागपूरला ते विमानाने आले होते. तेथून मतदारसंघात येत असताना कारला उमरेड बायपासजवळ ट्रकची जोरदार धडक बसली. यामध्ये पडोळे यांच्यासह इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे.
पडोळेंना आणण्यासाठी कारने त्यांचे पीए यश पाटील, वाहन चालक राहुल गिऱ्हेपुंजे व खासदारांचा मित्र गिरीश रहांगडाले असे तिघे नागपूरला गेले होते. पडोळे यांना घेऊन ते नागपूर - भंडारा या राष्ट्रीय महामार्गावरून परतीच्या प्रवासाला निघाले होते. यावेळी हा अपघात झाला.
भंडाऱ्याकडे येत असताना उमरेड बायपासवर एका ट्रकने जोराची धडक दिली. यात पडोळेंच्या गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. भंडारे यांच्या डोक्याला मागील बाजुला मार लागला होता. प्रथमोपचारानंतर त्यांना सोडून देण्यात आले.