भांबोरा : मुलीचा विनयभंग करणा-यांची घरे संतप्त गावक-यांनी पेटवली
By Admin | Updated: July 30, 2016 14:17 IST2016-07-30T14:12:33+5:302016-07-30T14:17:39+5:30
अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील भांबोरा येथे शुक्रवारी मुलीची छेड काढण्यात आल्याच्या घटनेचे गावात संतप्त पडसाद उमटले असून गावक-यांनी आरोपींच्या घरावर हल्ला चढवला घरे पेटवली

भांबोरा : मुलीचा विनयभंग करणा-यांची घरे संतप्त गावक-यांनी पेटवली
>ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. ३० - कर्जत तालुक्यात कोपर्डीपाठोपाठ भांबोरा येथे एका अल्पवयीन मुलीचा विनयभंगप्रकरणी आता वातावरण आणखीच चिघळले आहे. संतप्त ग्रामस्थांनी शुक्रवारी संशयित तरूणांसह पोलिसांना डांबून ठेवल्यानंतर शनिवारी पुन्हा ग्रामस्थांनी संशयितांच्या घरांना आग लावली, तसेच काही घरे पाडली. पालकमंत्र्यांनी तातडीने सकाळी गावात भेट देऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले.
भांबोरा येथे शुक्रवारी नववीतील एका विद्यार्थिनीस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न झाला. मात्र जागृत ग्रामस्थांमुळे या मुलीची सुखरूप सुटका झाली. नंतर ग्रामस्थांनी मुलीस पळवून नेणाऱ्या तरूणांसह तेथे आलेल्या पोलिसांनाही डांबून ठेवले. रात्री उशिरा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन तिघा पोलिसांना निलंबित केले. काही वेळ शांत झालेले हे वातावरण शनिवारी सकाळी पुन्हा चिघळले. ग्रामस्थांनी दुधोडी गावातील संशयित आरोपींच्या घरांना लाग लावली, तसेच काही घरे जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्थ केली. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री सुरेश धस यांनी भांबोरा गावात भेट देऊन ग्रामस्थांना शांततेचे आवाहन केले. दरम्यान, गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.