भालचंद्र नेमाडेंचा सरकारकडून गौरव
By Admin | Updated: May 8, 2015 04:26 IST2015-05-08T04:26:08+5:302015-05-08T04:26:08+5:30
मराठीतील चार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांच्या कोसला, हिंदू, विशाखा, ययाती अशा विविध अद्वितीय कलाकृतींतील संवाद, उतारे, कविता यांच्या उत्कट सादरीकरणाने रसिकांना

भालचंद्र नेमाडेंचा सरकारकडून गौरव
मुंबई : मराठीतील चार ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांच्या कोसला, हिंदू, विशाखा, ययाती अशा विविध अद्वितीय कलाकृतींतील संवाद, उतारे, कविता यांच्या उत्कट सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते मराठी भाषा व सांस्कृतिक कार्य विभागातर्फे गेट वे आॅफ इंडिया येथे आयोजित ‘गौरव ज्ञानपीठ विजेत्यांचा, गौरव मराठी भाषेचा’ या सोहळ्याचे.
सोहळ्यात वि.स. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर यांचे स्मरण करण्यात आले. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोसलाकार भालचंद्र नेमाडे यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा माधवी वैद्य, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ़ सदानंद मोरे, मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा फैयाज उपस्थित होते. कवी किशोर कदम, तुषार दळवी, स्वानंद किरिकरे, रिमा लागू, वंदना गुप्ते यांनी मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त लेखकांच्या विविध कलाकृतीतील संवाद, उतारे, कविता, पदे यांचे अभिवाचन केले. कोसला या कादंबरीतील मनूचा मृत्यू या उताऱ्याच्या कदम यांनी केलेल्या अभिवाचनाने उपस्थितांचे डोळे पाणावले. श्रीधर फडके, आशा खाडिलकर, पद्मजा फेणाणी-जोगळेकर, नंदेश उमप, मुग्धा वैशंपायन यांनी माझ्या मातीचे गायन, गर्जा जयजयकार आदी गाणी सादर केली़ सोहळ्यास ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल, अभिनेते रमेश देव, ज्येष्ठ प्रकाशक रामदास भटकळ, लेखक जयंत पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)