भादलवाडी तलाव आटला

By Admin | Updated: July 31, 2016 01:15 IST2016-07-31T01:15:14+5:302016-07-31T01:15:14+5:30

भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलाव गेल्या सात महिन्यांपासून कोरडा ठणठणीत पडला आहे

Bhadalwadi Lake Atal | भादलवाडी तलाव आटला

भादलवाडी तलाव आटला


पळसदेव : भादलवाडी (ता. इंदापूर) येथील ब्रिटिशकालीन तलाव गेल्या सात महिन्यांपासून कोरडा ठणठणीत पडला आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होऊन, येथील ग्रामस्थांना ऐन पावसाळ्यात दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलाव जानेवारी महिन्यातच पाणीसाठा संपल्याने कोरडा पडला. खडकवासला कालव्याच्या पाण्यावर या तलावाचे भवितव्य अवलंबून आहे. एका वर्षाच्या काळात या तलावात खडकवासला कालव्याच्या पाण्याचे आवर्तन आलेले नाही. त्यामुळे या तलावावर अवलंबून असणारी शेती, पाणीपुरवठा योजना धोक्यात आली आहेत. कधी नव्हे एवढी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आटल्याने ७ महिन्यांपासून भादलवाडीकरांना पाणीटंचाईची समस्या आहे. त्यामुळे खडकवासला कालव्याच्या आवर्तनाचे पाणी तलावात सोडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सर्व तलावात पाणी सोडले जाते. मात्र, भादलवाडी तलावाबाबत राज्यकर्ते दुजाभाव करतात, असा आरोप ग्रामस्थ केला आहे.
भादलवाडी गावाला पाणीटंचाई असताना प्रशासनाने मात्र शासकीय पाण्याचा टँकर गेल्या दहा दिवसांपासून बंद केला आहे. त्यामुळे पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. लोकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे पुन्हा टँकर सुरू करण्याची मागणी लोकांनी केली आहे.

Web Title: Bhadalwadi Lake Atal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.