सावधान.. सोशल मीडियावर अंधश्रद्धा पसरविली तर सहा महिन्यांची शिक्षा

By Admin | Updated: June 22, 2015 01:56 IST2015-06-22T01:56:38+5:302015-06-22T01:56:38+5:30

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत होऊ शकते कारवाई, श्याम मानव यांची माहिती.

Beware .. Superstition spreads on social media and six months' education | सावधान.. सोशल मीडियावर अंधश्रद्धा पसरविली तर सहा महिन्यांची शिक्षा

सावधान.. सोशल मीडियावर अंधश्रद्धा पसरविली तर सहा महिन्यांची शिक्षा

अकोला : फेसबुक, व्हॉट्स अँपसह सोशल मीडियावर अंधश्रद्धा पसरविणारे संदेश पाठविले जातात. या संदेशांमधून भीती दाखविण्याचा प्रयत्न केला जातो. हा प्रकार अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत मोडत असून, असे संदेश पाठविणार्‍यांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असा इशारा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी दिला आहे. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन रविवारी अकोल्यात करण्यात आले होते. या बैठकीसाठी श्याम मानव आले असता, त्यांनी 'लोकमत'शी बातचीत केली. जागृत हनुमानाचे एखादे छायाचित्र दहा जणांना पाठवा, एखादी देवी जागृत असून, नवसाला पावणारी आहे, हे छायाचित्र शेअर करा व २५ जणांना पाठवा अन्यथा नुकसान होईल, अशी भीती दाखविणारे व अंधश्रद्धा पसरविणारे अनेक संदेश, फेसबुक व व्हॉट्स अँपवर धडकत असतात. हे बेकायदेशीर असून, असे संदेश पाठविणार्‍यास तुरूंगाची हवा खावी लागू शकते, अशी माहिती प्रा. श्याम मानव यांनी यावेळी दिली.

प्रश्न : कायदा लागू झाल्यानंतरही कारवाई प्रभावीरीत्या होत नाही?
-कायदा लागू होऊन १ वर्ष १0 महिने झाले आहेत. यादरम्यान या कायद्यांतर्गत १४0 प्रकरणे दाखल झाली आहेत. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्याकरिता पोलिसांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. त्याकरिता आम्ही राज्यभरात पोलीस अधिकार्‍यांना तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण देत आहोत. पोलिसांना कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. आतापर्यंत कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रातील पोलीस अधिकार्‍यांना प्रशिक्षण दिले आहे. आता विदर्भातील पोलिसांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

प्रश्न : कायद्याचा प्रचार-प्रसार पूर्ण झाला, असे वाटते काय?
-कायद्याचा प्रचार व प्रसार सुरू आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर ३५ जिल्ह्यांत ३८ सभा घेण्यात आल्या. या सभांना भरभरून प्रतिसाद होता. ३५७ शाळांमध्ये व्याख्याने झाली. यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व जादूटोणाविरोधी कायदा, यावर मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांमध्ये १३0 वक्ते तयार करण्यात आले. हे वक्तेही या कायद्याचा व जादूटोणापासून होणार्‍या नुकसानाबाबत नागरिकांना जागरूक करीत आहेत. आमचे काम सुरूच आहे.

प्रश्न: कायदा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात लागू झाला होता. आता राज्यात सत्ताबदल होऊन हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे पक्ष भाजप व शिवसेनेची सत्ता आली आहे. हे सरकार कायद्याची अंमलबजावणी योग्यप्रकारे करीत आहे काय?
-हा कायदा जरी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात लागू झाला होता. तरी त्यावेळेसही भारतीय जनता पक्ष व शिवसेनेने कायदा लागू करण्यासाठी अनुमती दिली होती. या कायद्याला बजरंग दल व विश्‍व हिंदू परिषदेचा विरोध होता. मात्र, त्यानंतरही भाजपने या कायद्याला पाठिंबा दर्शविला. सत्ता आल्यानंतरही दोन्ही पक्षाचे सरकार संपूर्ण सहकार्य करीत आहे. त्यामुळेच मी राज्यात पोलीस अधिकार्‍यांना प्रशिक्षण देत आहे. कुणालाही माणसे मरावी, असे वाटत नाही. हा कायदा माणसं जगविणारा आहे. भाजप व सेनेच्या नेत्यांना अंधश्रद्धेमुळे माणसं मरावी असे कसे वाटेल.

प्रश्न : कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी काय आवश्यक आहे?
-कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. हा कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी दक्षता अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकार्‍यांना या कायद्याची संपूर्ण माहिती असणे व त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. तेच आम्ही करीत आहोत.

Web Title: Beware .. Superstition spreads on social media and six months' education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.